ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 8 - गेल्या काही सामन्यांपासून सुसाट सुटलेला मुंबई इंडियन्सचा विजयरथ अखेर सनरायझर्स हैदराबादने रोखला. शिखर धवनने केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर सात गडी राखून मात केली. या विजयामुळे 13 सामन्यांतून 15 गुणांसह हैदराबादने आयपीएलच्या क्वालिफायर फेरीसाठी आपले आव्हान कायम राखले आहे.
मुंबईने दिलेल्या 139 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरच्या रुपात हैदराबादला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. मात्र नाबाद 62 धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनने मोझेस हेन्रिक्स (44), युवराज सिंग (9) आणि विजय शंकर (नाबाद 15) यांच्यासाथीने हैदराबादला 19व्या षटकात विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या मुंबईला आज सनरायझर्स हैदराबादने माफक धावसंख्येत रोखले. सिद्धार्थ कौल आणि भुवनेश्वर कुमार यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर कर्णधार रोहित शर्माचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना चमक दाखवता न आल्याने मुंबईला निर्धारित 7 बाद 138 धावांपर्यंतच मजल मारता आली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या मुंबईची फलंदाजी गोलंदाजील अनुकूल खेळपट्टीवर कोलमडली. 45 चेंडूत 67 धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्माने एक बाजू लावून धरत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दुसरीकडून इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने 3, भुवनेश्वर कुमारने 2 तर मोहम्मद नबी आणि रशिद खानने प्रत्येकी एक बळी टिपला.