नवी दिल्ली : आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणारा सलामीवीर फलंदाज मुरली विजय आता वन-डे संघात स्थान मिळविण्यास उत्सुक आहे. कसोटी सामन्यानंतर टी-२० क्रिकेट खेळणे कठीण असले तरी मला टी-२० क्रिकेट आवडते, असेही विजय म्हणाला.कसोटी संघात स्थान पक्के असल्यामुळे क्रिकेटपटू म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी मदत मिळाली, असेही ३१ वर्षीय विजय म्हणाला. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत छाप सोडण्याचे लक्ष्य असल्याचे त्याने सांगितले. विजय पुढे म्हणाला, ‘क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळण्याच्या उद्देशाने क्रिकेट कारकिर्दीला प्रारंभ केला. मला अखेर भारतीय संघात स्थान पक्के करण्यात यश आले. तीन-चार वर्षे संघाबाहेर राहिल्यानंतर फलंदाजीतील उणिवा दूर करण्यात मदत झाली.’ आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करणारा विजय पुढे म्हणाला, ‘मर्यादित षटकांच्या सामन्यांत राष्ट्रीय संघात प्रतिनिधित्व करण्याची संधी केव्हा मिळेल, याची मला कल्पना नाही; पण क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळण्यासाठी उत्सुक असून त्यासाठी मेहनत घेत आहे.’ विजयने आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर पुढे सरसावत फटके खेळताना छाप सोडली आहे; पण आयपीएलमध्ये मात्र त्याला फटके खेळताना जोखीम पत्करावीच लागते. मला आव्हान स्वीकारणे नेहमीच आवडते.
मुरली विजय वन-डे संघात पुनरागमनास उत्सुक
By admin | Published: April 17, 2015 11:57 PM