मेलबोर्न : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला टेनिसपटू अँडी मरेने आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये पहिले जेतेपद पटकावण्याच्या मोहिमेची सुरुवात करताना घाम गाळला. केई निशिकोरी व गतविजेती अँजेलिना कर्बर, व्हीनस विलियम्स यांनीही आपापल्या गटात दुसरी फेरी गाठली. ‘आॅस्ट्रेलियन ओपन’ची गतविजेती अँजेलिना कर्बर हिनेही स्पर्धेत विजयी अभियान सुरू केले. तिने सलामीच्या लढतीत युक्रेनच्या लेसिया त्सुरेन्को हिला तिने ६-२, ५-७, ६-२ असे पराभूत केले.स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल महिला विभागात नोंदविला गेला. चौथ्या मानांकित सिमोना हालेपला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. पाचवेळा आॅस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठणारा आणि त्यात चारवेळा मुख्य प्रतिस्पर्धी नोवाक जोकोव्हिचविरुद्ध पराभव स्वीकारावा लागलेल्या मरेने रोड लेव्हर परिसरात २ तास ४७ मिनिटे रंगलेल्या लढतीत युक्रेनच्या इलिया माचेंकोचा ७-५, ७-६, ६-२ ने पराभव केला. दुसऱ्या फेरीत त्याला रशियाच्या आंद्रे रुबलेव्हच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.पाचव्या मानांकित जपानच्या निशिकोरीला पाच सेट््सपर्यंत संघर्ष करावा लागला. निशिकोरीने रशियाच्या आंद्रे कुज्नेत्सोव्हाची झुंज ५-७, ६-१, ६-४, ६-७, ६-२ ने मोडून काढली. सातव्या मानांकित क्रोएशियाच्या मारिन सिलिचला झुंजार लढतीचा सामना करावा लागला. पोलंडच्या जानोविचविरुद्ध पाच सेट््सपर्यंत रंगलेल्या लढतीत सिलिचने ४-६, ४-६, ६-२, ६-२, ६-३ ने सरशी साधली. (वृत्तसंस्था)>फेडची विजयी सलामी१७ ग्रँडस्लॅम जेतेपदाचा मानकरी स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला २०१६ मध्ये दुखापतींना सामोरे जावे लागले. त्याने सोमवारी पुनरागमन करताना आॅस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत विजय मिळवला. फेडररने एकवेळ ज्युनिअर पातळीवर प्रतिस्पर्धी असलेल्या आॅस्ट्रियाच्या जुर्गेन मेल्जरविरुद्ध ७-५, ३-६, ६-२, ६-२ ने विजय मिळवला. १७ व्या मानांकित फेडररपुढे आता अमेरिकेच्या नोह रुबीनचे आव्हान असेल.
मरे, निशिकोरीचे संघर्षपूर्ण विजय
By admin | Published: January 17, 2017 4:56 AM