Murli Sreeshankar in World Athletics Championships : भारताच्या मुरली श्रीशंकर याने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला. अशी कामगिरी करणारा पहिला पुरूष भारतीय खेळाडू ठरत त्याने नवा इतिहास रचला. पुरुष लांब उडीपटू मुरली श्रीशंकर याने आपली सर्वोत्तम कामगिरी करत भारताचे नाव उंचावले. त्याआधी ३,००० मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे यानेही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अपेक्षित कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीशंकरने एकूण आठ मीटर लांब उडी ( Long Jump ) मारून गट ब पात्रता फेरीत दुसरे आणि एकूण सातवे स्थान पटकावले.
अंजू बॉबी जॉर्ज ही जागतिक चॅम्पियनशिप लांब उडी अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय होती. पॅरिसमध्ये २००३ साली कांस्यपदक जिंकणारी देखील ती पहिली भारतीय आहे. आता या पुरूषांच्या गटात श्रीशंकरने हा इतिहास रचला आहे. इतर दोन भारतीय जेस्विन आल्ड्रिन (७.७९ मी) आणि मोहम्मद अनीस याहिया (७.७३ मी.) अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. ते गट अ पात्रतेमध्ये अनुक्रमे नवव्या आणि ११व्या स्थानावर राहिले. या स्पर्धेत ८.१५ मीटर किंवा दोन्ही गटातील सर्वोत्तम १२ खेळाडू रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
श्रीशंकरने अशी मारली फायनल्स मध्ये धडक-
फायनल्स मध्ये पात्र ठरण्यासाठी ८.१५ मीटर अंतराचे आपोआप पात्र होण्याचे (डिफॉल्ट क्वालिफिकेशन) नियम होते. श्रीशंकरला ते अंतर गाठता आले नाही पण अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या सर्वोत्कृष्ट १२ खेळाडूंमध्ये त्याने स्थान मिळविले. एप्रिलमध्ये ८.३६ मी., त्यानंतर ग्रीसमध्ये ८.३१ मी. आणि नॅशनल इंटर-स्टेट चॅम्पियनशिपमध्ये ८.२३ मी. अशी उडी मारून २३ वर्षीय श्रीशंकरने सातत्यपूर्ण कामगिरी केली.