मेलबर्न : जागतिक टेनिसचा अव्वल खेळाडू अँडी मरे याला सोमवारपासून सुरू होत असलेल्या आॅस्ट्रेलियान ओपन टेनिसमध्ये सहाव्यांदा जेतेपद मिळवायचे झाल्यास केई निशिकोरी आणि स्टेन वावरिंका यांच्यासारख्या दिग्गजांचे कडवे आव्हान मोडीत काढावे लागणार आहे.मागच्या वर्षी विम्बल्डन आणि आॅलिम्पिक जेतेपद पटकाविल्यानंतर वर्षाअखेरीस नंबर वन बनलेला मरे आॅस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात पाच वेळा पराभूत झाला आहे. यापैकी चारवेळा त्याला सध्याचा विजेता नोवाक जोकोविच याने मात दिली. यंदा मरेला पहिल्या फेरीत युक्रेनचा इलिया मार्चेको याच्याविरुद्ध तसेच उपांत्यपूर्व फेरीत पाचवा मानांकित निशिकोरी, रॉजर फेडरर यांच्यापैकी एकाविरुद्ध तसेच उपांत्य सामन्यात २०१४चा विजेता वावरिंकाविरुद्ध खेळावे लागू शकते. फेडररला १७ वे मानांकन लाभले. पहिल्या फेरीत त्याला नवख्या खेळाडूचा सामना करायचा असून, तिसऱ्या फेरीत दहावा मानांकित टॉमस बर्डिचविरुद्ध झुंजावे लागेल. जोकोविच यंदा पुरुष ड्रॉच्या दुसऱ्या हाफमध्ये असून, त्याला दुसरे मानांकन मिळाले. तो पहिला सामना स्पेनचा फर्नांडो वर्डास्को याच्याविरुद्ध खेळणार असून, ४०वे मानांकन असलेल्या वर्डास्कोने १३ पैकी ४ लढतीत जोकोविचवर विजय साजरा केला आहे. मागच्या वर्षी वर्डास्कोने आपलाच सहकारी राफेल नदाल याचा पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत फडशा पाडला होता. विक्रमी सातव्या आॅस्ट्रेलियन ओपन जिंकण्याच्या तयारीत असलेल्या जोकोविचला चौथ्या फेरीत ग्रिगोर दिमित्रेव किंवा आॅस्ट्रियाचा डोमिनिक थिम यांच्यापैकी एकाशी झुंज द्यावी लागेल. सेमीफायनलमध्ये त्याची गाठ कॅनडाचा मिलोस राओनिच याच्याविरुद्ध पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. राओनिचला जर्मनीचा डस्टिन ब्राऊन याच्याविरुद्ध पहिला सामना खेळायचा असून, चौथ्या फेरीत चेन्नई ओपनचा विजेता राबर्टो बॅटिस्टा आगूट याच्याविरुद्ध खेळावे लागेल. २००९ चा विजेता नदालला नववे मानांकन मिळाले. त्याला तिसऱ्या फेरीत जर्मनीचा प्रतिभावान खेळाडू अलेक्झांड्रोव्ह झेवरेव्ह याच्याविरुद्ध दोन हात करावे लागतील. आॅस्ट्रेलियाचा निक किर्गियोस याला १४ वा मानांकित पोर्तुगालचा गस्ताओ इलियास याच्याविरुद्ध सलामीला खेळायचे आहे.(वृत्तसंस्था)सेरेनाच्या सातव्या जेतेपदाचा मार्ग खडतरसहा वेळेची विजेती अमेरिकेची सेरेना विलियम्स हिचा आॅस्ट्रेलिया ओपन टेनिसमधील सातव्या जेतेपदाचा मार्ग सोपा नाही. सेरेनाला कठोर, तर सध्याची विजेती अँजेलिक कर्बेर हिला सोपा ड्रॉ मिळाला. सोमवारपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत २३ व्या ग्रँडस्लॅमसाठी उतरणाऱ्या सेरेनाला सुरुवातीला सातव्या स्थानावरील स्विस खेळाडू बेलिंडा बेनसिच हिच्याविरुद्ध खेळायचे आहे. गतवर्षी कर्बरकडून अव्वल स्थान गमाविणारी दुसरी मानांकित सेरेना हिला चौथ्या फेरीत योहाना कोंटा आणि उपांत्यपूर्व फेरीत स्लोव्हाकियाची सहावी मानांकित डोमिनिका सिबुलकोवा हिच्याविरुद्ध खेळावे लागेल. सेमीफायनलमध्ये सेरेनाला कॅरोलिना पिसिलकोवा हिच्याविरुद्ध खेळावे लागू शकते. अमेरिकन ओपनमध्ये पिसिलकोवाने सेरेनाला नमविले होते. विश्व क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या कर्बेरला एग्निका रंदाव्हस्काविरुद्ध खेळावे लागेल.
मरे, जोकोविच यांना कठीण ड्रॉ
By admin | Published: January 14, 2017 1:16 AM