लंडन : अमेरिकेची दिग्गज टेनिसस्टार व्हीनस विल्यम्स, गतविजेता ब्रिटनचा अँडी मरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयी सुरुवात केली. मात्र, यासाठी तिला बेल्जियमच्या एलिस मेर्टन्सविरुद्ध चांगलेच झुंजावे लागले. त्याचवेळी, पुरुषांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ग्रेट ब्रिटनच्या अँडी मरेने अपेक्षित विजयी सलामी देताना कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बबलिकविरुद्ध सहज विजय मिळवला.अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात एलिसने आपल्याहून अधिक अनुभवी असलेल्या बुजूर्ग व्हीनसला कडवी टक्कर दिली. व्हीनसने पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र आक्रमक खेळ करताना ७-६ (९-७), ६-४ अशी बाजी मारली. पुरुष गटात गतविजेत्या अँडी मरेने धडाक्यात विजयी सलामी देताना नवख्या अलेक्झांडरचा ६-१, ६-४, ६-२ असा फडशा पाडला. सुरुवातीपासून मरेने केलेल्या आक्रमक खेळापुढे अलेक्झांडरचा काहीच निभाव लागला नाही. दरम्यान, पुरुष गटाच्या अन्य लढतीत निक किर्गियोसला दुखापतीमुळे पहिल्याच सामन्यातून माघार घ्यावी लागली. दुसरीकडे जपानचा नववा मानांकित केई निशिकोरीने इटलीच्या मार्काे सेसचिताओला ७२ मिनिटांच्या लढतीत ६-२, ६-२, ६-० तर फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगाने कैमरन नौरीला ६-३, ६-२, ६-२ असे पराभूत केले.(वृत्तसंस्था)
मरे, व्हीनसची विजयी सलामी
By admin | Published: July 04, 2017 1:43 AM