ढाका : बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानच्या खांद्यावर पुढील महिन्यात शस्त्रक्रिया होणार असून त्यानंतर सहा महिने त्याला विश्रांती घ्यावी लागणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीबीसी) मीडिया समितीचे चेअरमन जलाल युनूस यांनी सांगितले की,‘मुस्तफिजूर शस्त्रक्रियेसाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया इंग्लंडमध्ये करायची की आॅस्ट्रेलियात याबात अद्याप निर्णय झालेला नाही. शल्यविशारदाबाबतचा निर्णय सोमवारपर्यंत घेण्यात येईल.’’ मुस्तफिजूर सध्या इंग्लंडमध्ये असून ससेक्स संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्याने संघातर्फे दोन सामने खेळले. त्यानंतर त्याला खांद्याच्या दुखापतीचा त्रास जाणवला. त्याने ब्रिटनमधील एका डॉक्टरसोबत संपर्क साधला. त्याने त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेनंतर त्याला सहा महिने क्रिकेटपासून दूर राहवे लागेल. त्यामुळे त्याला आॅक्टोबरमध्ये इंग्लंडविरुद्ध आणि वर्षाअखेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत सहभागी होता येणार नाही. युनूस पुढे म्हणाले,‘मी गेल्या काही दिवसांमध्ये मुस्तफिजूरबाबतच्या दुखापतीचा अहवाल अनेक ठिकाणी पाठविला. त्याच्यावरील शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही त्यासाठी ब्रिटन व आॅस्ट्रेलियातील तज्ज्ञांसोबत संपर्क केला आहे. मुस्तफिजूरवर शस्त्रक्रिया कोण करणार, या बाबतचा निर्णय सोमवारपर्यंत घेण्यात येईल. तो मानसिकदृष्ट्या शस्त्रक्रियेसाठी तयार आहे.’ (वृत्तसंस्था)
मुस्तफिजूर सहा महिने क्रिकेटपासून दूर
By admin | Published: July 31, 2016 5:50 AM