ओडिशा : भारताची सर्वात जलद महिला धावपटू द्युती चंदने शनिवारी समलैंगिक असल्याचे जाहीर केले. ओडिशाच्या चाका गोपालपूर येथील मैत्रीणीशी प्रेमसंबंध असल्याचे द्युतीनं एका सांगितले. मात्र, तिने मैत्रीणीची ओळख सांगण्यास नकार दिला. उगाच आपल्यामुळे तिला त्रास होऊ नये ही त्यामागची द्युतीची भावना आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच सार्वजनिकरित्या समलैंगिक असल्याचा दावा केला आहे. द्युतीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक झाले, परंतु हे जगजाहीर करण्यामागेही एक कारण असल्याचे समोर आले आहे.
द्युतीने 2018च्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये द्युतीने देशाला रौप्यपदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिचे हे दुसरे पदक ठरले. द्युतीने 100 मीटर स्पर्धेत २० वर्षांत भारताला प्रथमच पदक मिळवून दिले. द्युतीने 11.32 सेकंदाची वेळ नोंदवली. 200 मीटर शर्यतीत द्युतीने 23.20 सेकंदांची वेळ नोंदवली. एकाच आशियाई स्पर्धेत 100 मी. व 200 मी. शर्यतीत पदक जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू ठरली. याआधी लेव्ही पिंटो, आर. ज्ञानसेखरण, पी.टी.उषा यांनी हा विक्रम केला होता. शिवाय 100 मीटर स्पर्धेचा राष्ट्रीय विक्रमही तिच्याच नावावर आहे.
सध्या ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची तयारी करत असून 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देण्याचा तिचा निर्धार आहे. ती म्हणाली,''मला समजून घेणारा जीवनसाथी मिळाला आहे. आपल्याला कोणासोबत आयुष्य घालवायचे आहे, याचे स्वातंत्र्य सर्वांना मिळायला हवं. समलैंगिक असलेल्यांना मी नेहमी पाठींबा दिला आहे आणि ही वैयक्तीक निवड आहे. सर्वोच्च न्यायलयानेही 377 कलमाबद्दल दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मला हे बोलण्याचे धाडस मिळाले आहे. खेळाडू म्हणून माझ्या कामगिरीवर शंका उपस्थिक करण्याचा कोणालाही अधिकार नाही. समलैंगिक संबंध ठेवणे हा माझा वैयक्तीक निर्णय आहे आणि त्याचा आदर करायला हवा. भारतासाठी मी पदक जिंकत राहीन.''
मंगळवारी आपण असे का जाहीर केले, याचा खुलासा केला. ती म्हणाली,''माझी बहीण सतत ब्लॅकमेल करत होती. तिने माझ्याकडे 25 लाखांची मागणी केली होती. एकदा तर तिने मला मारहाणही केली. त्याबाबत मी पोलिसात तक्रारही केली आहे. तिच्या या ब्लॅकमेल करण्यामुळेच मला हे जगजाहीर करावे लागले.''