नवी दिल्ली : स्टार टेनिसपटूसानिया मिर्झा ग्रँडस्लॅमच्या टेनिस कोर्टवर आता कधीच पुन्हा खेळताना दिसणार नाही. तिने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 2023 च्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरी प्रकारात रोहन बोपण्णासोबत अंतिम फेरी गाठली. मात्र, अंतिम सामन्यात त्यांना लुएसा स्टेफनी आणि राफेल मातोस या ब्राझीलच्या जोडीने सलग दोन सेटमध्ये 7-6, 6-2 असे पराभूत केले. अशाप्रकारे आपल्या 18 वर्षांच्या कारकिर्दीतील शेवटच्या ग्रँडस्लॅम सामन्यातील पराभवानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेचा निरोप घेताना सानियाच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने आपल्या इथपर्यंतच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
मेलबर्नमध्येच झाली होती सुरूवातऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना जोडीचा पराभव झाला. ब्राझीलच्या राफेल मातोस आणि लुएसा स्टेफनी या जोडीने सानिया-रोहन जोडीला 7-6(7-2), 6-2 अशा दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले. या पराभवानंतर आपल्या कारकिर्दीला निरोप देताना सानिया मिर्झा भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतर कोर्टवर मुलाखतीदरम्यान सानिया म्हणाली, "माझ्या करिअरची सुरुवात मेलबर्नमध्येच झाली. 2005 मध्ये मी 18 वर्षांची असताना सेरेना विल्यम्ससमोरही एक सामना खेळला होता. त्यादरम्यान तिसऱ्या फेरीतून बाहेर पडले होते. आता याच मेलबर्नच्या मैदानावरून माझ्या 18 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट करणे माझ्यासाठी खूप खास आहे. मी माझ्या कारकिर्दीचा यापेक्षा चांगला शेवट करू शकत नाही."
दरम्यान, सानिया मिर्झाने आधीच स्पष्ट केले होते की, ती तिच्या कारकिर्दीतील शेवटची ग्रॅंडस्लॅम स्पर्धा खेळत आहे. तसेच फेब्रुवारीमध्ये दुबई येथे होणारी डब्ल्यूटीए स्पर्धा ही तिच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल असे सानियाने जाहीर केले होते. लक्षणीय बाब म्हणजे सानिया मिर्झाने 2005 मध्ये कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनच्या रूपात खेळले होते.
महिला दुहेरीत सानियाने जिंकलेली विजेतेपदे :-
- ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरी - 2016 विजेता
- विम्बल्डन - 2015 विजेता
- यूएस ओपन - 2015 विजेता
मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाचे किताब -
- ऑस्ट्रेलियन ओपन - 2009 विजेता
- फ्रेंच ओपन - 2012 विजेता
- यूएस ओपन - 2014 विजेता
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"