रोहित नाईक
मुंबई : ‘मला विश्वास आहे की, दुहेरीतील माझा १८ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम भारतीय खेळाडूकडून नक्की मोडला जाऊ शकतो. जर मी ही कामगिरी करू शकतो, तर नक्कीच कोणीही हा विक्रम मोडू शकतो. या गोष्टीसाठी खूप वेळ लागेल, पण एक दिवस हा विक्रम नक्की मोडला जाईल,’ असा विश्वास भारताचा माजी दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
ऑल इंग्लंड क्लबच्या वतीने मुंबईत रविवारी विम्बल्डन पुरुष अंतिम सामन्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात पेस उपस्थित होता. पेस म्हणाला की, ‘विम्बल्डन स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. विम्ब्लडनच्या बोर्डवर झळकणारे भारताचे नाव पाहणे माझ्यासाठी सर्वांत आनंदाची बाब आहे.’ भारतीय टेनिसप्रती पेसने खंतही व्यक्त केली. याबाबत त्याने सांगितले की, ‘भारतीय टेनिससाठी सध्याचा काळ कठीण आहे. विविध स्पर्धांसाठी अनेक देशांचे दौरे करणाऱ्या भारतीय खेळाडूंप्रती मला आदर आहे. त्यांना खूप मोठा आर्थिक भार उचलावा लागतो. यासाठी टेनिस संघटना खर्च करत नाही. क्रिकेट, हॉकी, फुटबॉलसाठी त्यांच्या संघटना सर्व खर्च करतात, ९९.९९ टक्के टेनिस स्पर्धा भारताबाहेर होतात. जेव्हा मी विम्बल्डन ज्युनिअर जेतेपद पटकावले, त्यानंतर भारतात ४ हजार टक्क्यांनी टेनिसपटूंची संख्या वाढली होती. आज मला ही प्रगती दिसत नाही.’
रॉजर फेडररचा सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जेतेपदाचा विक्रम राफेल नदालने मोडला आणि २२ ग्रँडस्लॅम जिंकले. हा विक्रम पुढे नोव्हाक जोकोविचने मोडताना २३ ग्रँडस्लॅम पटकावले. जर, भविष्यात कार्लोस अल्काराझ दुखापतीपासून दूर राहिला, तर पुढचा दिग्गज तोच असेल. - लिएंडर पेस