सिडनी : आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायेकल क्लार्क हा स्टीव्हन स्मिथ याला स्वत:चा उत्तराधिकारी मानतो. संघाची धुरा सांभाळण्याची क्षमता स्मिथमध्ये असल्याचा आशावाद क्लार्कने व्यक्त केला.स्मिथ हा संघाला वैभव मिळवून देऊ शकेल, असा विश्वास दर्शवीत क्लार्क म्हणाला, ‘माझ्या मते स्मिथ हा कारकिर्दीच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याकडे कर्णधारपद सोपविण्याची हीच योग्य वेळ आहे. तो फलंदाजीत तरबेज आहेच; पण नेतृत्व सोपविल्यानंतरही त्याच्या कामगिरीवर परिणाम जाणवणार नाही.’ यंदा आॅस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणारा क्लार्क पुढे म्हणाला, ‘स्मिथ हा नेतृत्व आणि कर्णधारपद या दोहोंमध्ये ताळमेळ बसविण्यात यशस्वी होईल, असा विश्वास आहे. संघात क्षमतावान खेळाडू असल्यामुळे आगामी बांगलादेश दौऱ्यात उत्कृष्ट निकाल येतील याची खात्री आहे.’अॅशेस मालिका आटोपताच क्लार्कसोबत ख्रिस रॉजर्स, रेयॉन हॅरिस आणि शेन वॉटसन या दिग्गजांनी निवृत्ती घेतली. बांगला दौऱ्यात विजय मिळविण्याची जबाबदारी कर्णधार स्मिथच्या खांद्यावर आली आहे. २००४ साली भारताविरुद्ध १५१ धावा ठोकून झकास पदार्पण करणारा क्लार्क म्हणतो, ‘क्रिकेटमध्ये स्वत:ला पारखण्यासाठी केवळ एका संधीची गरज असते.’ (वृत्तसंस्था)
स्टीव्ह स्मिथ माझा उत्तराधिकारी : क्लार्क
By admin | Published: September 18, 2015 12:04 AM