नवी दिल्ली : भारताचा दिग्गज आणि सर्वांत यशस्वी टेनिसपटू लिएंडर पेस याने स्पेनचा महान खेळाडू राफेल नदालचा सराव आणि त्याचा खेळ पाहून खूप काही शिकण्यास मिळेल, असे म्हटले. डेव्हीस चषक लढतीसाठी भारतात आलेल्या स्पेनच्या संघाचा खेळ देशातील प्रत्येक नवोदित खेळाडूने पहावा, असेही पेसने सांगितले.स्पेनच्या बलाढ्य संघामध्ये १४ ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदालसह, डेव्हीड फेरर, मार्क लोपेझ आणि फेलिसियानो लोपेझ यांचा समावेश आहे. या सामन्याविषयी पेसने म्हटले की, ‘‘हा सामना म्हणजे भारतात टेनिसचे शानदार असेल. जर, मी नवोदित खेळाडू असतो तर नक्कीच रोज स्टेडियमवर आलो असतो. नदालला खेळताना पाहून मी आजही खूप काही शिकू शकतो. त्याच्याकडून फुटवर्क, ताकद आणि फटके मारण्याची पद्धत अशा अनेक गोष्टी शिकता येतील.’’ तगड्या स्पॅनिश संघाबाबत पेसने सांगितले की, ‘‘माझ्यासाठी सर्वोत्तम व्यावसायिक संघापैकी एक स्पेनचा संघ आहे. ते एकत्रितपणे संघर्ष करतात. या संघाबद्दल मला किती आदर आहे हे मी शब्दांत सांगू शकत नाही. त्यांच्याकडे महान खेळाडूंमध्ये गणना होत असलेला नदाल आहे. त्याच्यासह खेळण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी नशीब आहे. याआधी त्यासह २०१५ साली पॅरीस मास्टर्स स्पर्धेत दुहेरीत खेळलो आहे.’’ भारताचे युवा खेळाडू साकेत मिनेनी आणि रामकुमार रामनाथन यांच्याकडे बलाढ्य स्पेनविरुद्ध स्वत:ला पारखण्याची सुवर्णसंधी असल्याचेही पेसने या वेळी म्हटले. याबाबत पेसने दोन्ही खेळाडूंना उद्देशून सांगितले की, ‘‘तुमच्याकडे या सामन्यात गमावण्यासारखे काहीही नसेल. तुम्ही संघाला वर्ल्ड ग्रुप प्ले आॅफ फेरीपर्यंत घेऊन आलात ही आमच्यासाठी गर्वाची बाब आहे.’’ तसेच, या सामन्यात माझी भूमिका पुढील पिढीला पारखण्याची असल्याचेही पेसने या वेळी म्हटले.त्याचप्रमाणे, दुहेरीमधील आपल्या साथीदाराविषयी पेसने सांगितले की, ‘‘मी कोणाच्याही सोबत खेळण्यास तयार आहे. मी नऊ पिढींच्या खेळाडूंसह खेळलो आहे आणि त्यासाठी कोणत्याही खेळाडूसह खेळण्याची माझी तयारी आहे. यामुळे माझ्या खेळावर काहीही फरक पडणार नाही. माझे काम युवा खेळाडूंना पारखण्याचे आहे.’’
नदालकडून शिकण्यास मिळेल
By admin | Published: September 14, 2016 5:16 AM