ऑऩलाइन लोकमतरोम, दि. 18 : क्ले कोर्टचा बादशहा राफेल नदाल याने आपलाच सहकारी निकोलस अलमार्गो याने सामन्यादरम्यान माघार घेताच रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक दिली. नदालचा स्पर्धेतील हा ५० वा विजय ठरला. महिला गटात विश्व क्रमवारीतील अव्वल स्थानावरील खेळाडू अँजेलिक कर्बर हिला मातत्र पराभवाचे तोंड पहावे लागले. फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत तीनदा नदालकडून पराभूत झालेला अलमार्गो केवळ २४ मिनिटे कोर्टवर होता. त्याने माघार घेतली तेव्हा नदाल पहिल्या सेटमध्ये ३-० ने पुढे होता. नदालने यंदा मोंटेकार्लो, बार्सिलोना आणि माद्रिद ओपनचे जेतेपद पटकविले असून फ्रेंच ओपनपूर्वी शानदारफॉर्ममध्ये आहे.स्वित्झर्लंडचा तिसरा मानांकित स्टेन वावरिंका हा देखील पुढील फेरीत दाखल झाला. त्याने बेनोइट पियरेवर ६-३, १-६, ६-३ ने विजय साजरा केला. कॅनडाचा पाचवा मानांकित मिलोस राओनिच याने टॉमी हास याच्यावर ६-३, ६-४ ने आणि जपानचा केई निशिकोरीने डेव्हीड फेररचा ७-५, ६-२ ने पराभव केला. महिला गटात अव्वल स्थानावर असलेली कर्बर ही एस्टोनियाची एनेट कोंटावीटहिच्याकडून ६-४, ६-० ने पराभूत झाली. अन्य लढतीत दुसरी मानांकित कॅरोलिना पिलिसकोवाने लॉरेन डेव्हिसचा ६-१, ६-१ ने, सिमोन हालेपने जर्मनीची लॉरा सिग्मेंटचा ६-४, ६-४ ने आणि आठवी मानांकित एलिना स्वितलोवाने अलाईज कार्नेटचा ६-४, ७-६ ने पराभव केला.
रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत नदालचा ५० वा विजय
By admin | Published: May 18, 2017 8:20 PM