अमरावती : अदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २० ते २२ डिंसेबरदरम्यान अमरावतीत आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वैयक्तिक स्पर्धेत नागपूर विभागाने २७४ पदकांची कमाई करीत आघाडी मिळविली.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या भव्य परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांचे खो-खो, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल, कबड्डी हे सांघिक खेळ, तर लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे हा क्रीडा प्रकार वैयक्तिक स्तरावर घेण्यात आल्यात. शनिवारी स्पर्धेच्या दुसºया दिवशी १४ वर्षांआतील वयोगटातील सर्व खेळाडुंसाठी वैयक्तिक स्पर्धा, तर १७ व १९ वर्षांखालील वयोगटातील सांघिक सामने खेळविण्यात आले. यात वैयक्तिक सामन्यांमध्ये नागपूर विभागाने निर्विवाद वर्चस्व ठेवून २७४ पदकांची कमाई करीत प्रथम क्रमांक पटकाविला. नाशिक विभागाने २०० पदकांची कमाई करीत द्वितीय, अमरावती विभागाने ९२ पदके मिळवून तृतीय, तर ठाणे विभागाने ८१ पदके मिळवित चौथेस्थान प्राप्त केले.वैयक्तिक स्पर्धेचे बक्षीस वितरण ‘ट्रायबल’चे आयुक्त किरण कुलकर्णी, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके, डिग्री कॉलेजचे प्राचार्य अरूण खोडस्कर, राजेश महात्मे, आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अपर आयुक्त विनोद पाटील, उपायुक्त नितीन तायडे, प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे (अकोला), विशाल राठोड (कळमनुरी), दिलीप खोळले (औरंगाबाद), गितांजली निकम (पुसद) यांच्या हस्ते करण्यात आले.
आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धेत नागपूर आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 6:25 PM