नकोडा, शांभव, तुलसी इलेव्हन विजयी
By admin | Published: January 08, 2016 2:13 AM
एमपीएल : अरिहंत ईगल्स पराभूत
एमपीएल : अरिहंत ईगल्स पराभूतनागपूर : नकोडा चॅलेंजर्ससह शांभव युनायटेड आणि तुलसी इलेव्हन संघांनी गुरुवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत महावीर प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. महावीर युवक मंडळातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नकोडा (१४) आणि अक्षद इलेव्हन (१३) संघांनी उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. पहिल्या लढतीत नकोडा चॅलेंजर्सने अक्षद इलेव्हनचा चार गडी राखून पराभव केला. अक्षद इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ६ बाद ७९ धावांची मजल मारली. विकास बरमेचा आणि सुभाष लालवानी यांनी प्रत्येकी २५ धावांचे योगदान दिले. प्रतिस्पर्धी संघातर्फे राजेश जैनने दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात खेळताना नकोडा चॅलेंजर्सने विजयासाठी आवश्यक धावा ४ गडी राखून अखेरच्या चेंडूवर पूर्ण केल्या. संघाच्या विजयात संदेश कोटेचा (१८) आणि मनीष सावला (१७) यांची भूमिका महत्त्वाची ठरली. कोटेचा समानवीर पुरस्काराचा मानकरी ठरला. शांभव युनायटेडने निशलिन चॅम्प्सचा ३४ धावांनी पराभव केला. यश मेहताच्या आक्रमक ४८ धावांच्या खेळीच्या जोरावर शांभव युनयाटेडने ६ बाद ११२ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात निशलिन चॅम्प्सचा डाव १० षटकांत ७८ धावांत रोखल्या गेला. भाविक (२०) आणि अमन जैन (१६) यांनी सन्मानजनक खेळी केली. हार्दिक शाह (३-१२) यशस्वी गोलंदाज ठरला. तिसऱ्या लढतीत तुलसी इलेव्हनने अरिहंत ईगल्सचा २१ धावांनी पराभव केला. तुलसी इलेव्हनने ५ बाद १११ धावांची मजल मारली. निशांत देसाईने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात अरिहंत ईगल्स संघाचा डाव ७ बाद ९० धावांत रोखल्या गेला. प्रणव बोहराची ३५ धावांची खेळी अखेर व्यर्थच ठरली. तुलसी संघातर्फे नलिन बोरडिया (३-१५) यशस्वी गोलंदाज ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)