मुंबई : डी. जी. खेतान इंटरनॅशनल स्कूलच्या नमन कनोई आणि जमनाबाई नरसी स्कूलच्या झिला माओ यांनी शानदार कामगिरी करताना नुकताच झालेल्या ३८व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे मुलांच्या व मुलींच्या अॅथलेटिक्स गटात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे या दोघांनी स्पर्धेत प्रत्येक एक स्पर्धा विक्रमाची नोंदही केली. त्याचवेळी अॅथलेटिक्समध्ये बलाढ्य चिल्ड्रन्स अकादमीचे एकहाती वर्चस्व राहिले. चिल्ड्रन्स अकादमी (मालाड) संघाने सांघिक विजेतेपदावर कब्जा केला, तर आशानगर चिल्ड्रन्स अकादमी संघाने उपविजेतेपद पटकावले.१४ वर्षांखालील वयोगटामध्ये नमनने गोळाफेक प्रकारात स्पर्धा विक्रम करताना १४.७४ मीटरची जबरदस्त फेक केली. त्याचप्रमाणे थाळीफेकमध्येही नमनने सुवर्णपदक पटकावताना ३१.२८ मीटरची फेक करून बाजी मारली. दुसऱ्या बाजूला मुलींमध्ये झिलाचे वर्चस्व राहिले. १६ वर्षांखालील गटातून सहभागी होताना तिने ४०० मीटर शर्यतीत ६३.८ सेकंद अशी वेळ देत स्पर्धा विक्रम नोंदवला. त्याचप्रमाणे २०० मीटर व ८०० मीटर शर्यतीमध्येदेखील बाजी मारताना झिलाने स्पर्धेत आपला दबदबा राखला.झिलाप्रमाणेच मेरी इम्याक्युलेट (पोयसर) संघाच्या अनुष्का भंडारीनेही तीन सुवर्ण कमाई करताना सर्वांचे लक्ष वेधले. मात्र झिलाने स्पर्धा विक्रम नोंदवण्याची निर्णायक कामगिरी करीत बाजी मारली. अनुष्काने २०० मीटर, ६०० मीटर आणि लांब उडीमध्ये सुवर्ण पटकावले. तसेच मुलांच्या १६ वर्षांखालील गटात सेंट लॉरेन्सच्या (कांदिवली) शुभम पाटेकरने उंच उडी व लांब उडीमध्ये बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले. अॅथेलेटिक्सच्या सांघिक कामगिरीमध्ये अपेक्षेप्रमाणे बलाढ्य चिल्ड्रन्स अकादमीच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. मालाडच्या चिल्ड्रन्स संघाने सर्वाधिक ८९ गुणांसह स्पर्धेत आघाडी राखताना सांघिक विजेतेपदावर कब्जा केला. त्याचबरोबर आशानगर चिल्ड्रन्स अकादमी संघाने ६८ गुणांसह उपविजेतेपद उंचावले. (क्रीडा प्रतिनिधी)
नमन कनोई, झिला माओ सर्वोत्तम खेळाडू
By admin | Published: December 14, 2015 2:41 AM