नवी दिल्ली: विश्व युवा स्पर्धेचा कांस्यविजेता नमन तंवर याने गुरुवारी हेवीवेट (९१ किलो) गटाच्या चाचणीत आशियाडचा रौप्यविजेता सुमित सांगवान याला पराभूत करीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी होणा-या बॉक्सिंग संघात निवडीसाठी दावा भक्कम केला.शारीरिक वजन घटविण्यासाठी बॉक्सिंगकडे वळलेल्या तंवरने इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियममध्ये झालेल्या चाचणीत बलाढ्य प्रतिस्पर्धी सुमितला ‘नॉक आऊट’ केले. भारतीय बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) ९१ आणि ५२ किलो वजन गटासाठी चाचणी घेतली. अन्य सहा वजन गटांसाठी मागच्या वर्षी राष्टÑीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडू निवडण्यात आले. तंवर आणि सांगवान जानेवारीत झालेल्या इंडिया ओपनचे कांस्यविजेते होते. २० वर्षांच्या तंवरने कझाखस्तान येथील स्पर्धेत सुवर्ण तसेच सर्वोत्कृष्ट बॉक्सरचा बहुमान पटकवला होता. तंवरने चाचणीत विजय मिळविला खरा, मात्र उद्या रशियाच्या खेळाडूविरुद्ध विश्व बॉक्सिंग सिरिजमधील लढतीनंतरच राष्टÑकुलसाठी त्याचे संघातील स्थान निश्चित केले जाईल. यामागील कारण असे की, इंडिया ओपनमध्ये याच गटात सुवर्णविजेता असलेला संजित हादेखील विश्व बॉक्सिंग सिरिजमध्ये खेळणार आहे. त्याने स्वत:ची लढत जिंकल्यास ४ ते १५ एप्रिल या कालावधीत गोल्ड कोस्ट येथे होणाºया राष्टÑकुल स्पर्धेसाठी संजितला पाठविण्याचा बीएफआयने निर्णय घेतला आहे. अंतिम यादी पाठविण्याची अखेरची तारीख ५ मार्च आहे. (वृत्तसंस्था)
नमनचा सुमितला ‘नॉक आऊट’ पंच, भारतीय संघात निवडीसाठी दावा भक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 2:47 AM