नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी नेमबाजीमध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंनी आपली चमक दाखवताना भारतासाठी चमकदार कामगिरी केली. या वर्षी युवा खेळाडूंनी देशात आणि परदेशात शानदार कामगिरी करताना आपली दखल घेण्यास भाग पाडले, तर दुसऱ्या बाजूला सात दिग्गज निशाणेबाजांनी रिओ आॅलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केला. स्वप्निल कुसाळे, सुमेध कुमार, अनंत जीतसिंग नरुका आणि आंचल प्रतापसिंग ग्रेवाल, पुजा घाटकर या युवा खेळाडूंनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली असून, आॅलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा, जीतू राय, गगन नारंग आणि अपूर्वी चंदेला यांनी आॅलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला आहे. विशेष म्हणजे भारतीय निशाणेबाजीची कमजोरी मानल्या जात असलेल्या स्कीट प्रकारातही मेराज अहमद खान याने रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिला कोटा मिळवून आपली छाप पाडली. त्याचबरोबर या वर्षी अटलांटा आॅलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते एनियो फाल्को यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने स्कीट प्रकारात अनेक स्पर्धा गाजवल्या. नुकताच जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेत १७ वर्षीय अनंत जीतने सुवर्ण जिंकताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.भारताला पहिले वैयक्तिक आॅलिम्पिक गोल्डमेडल मिळवून देणाऱ्या अभिनव बिंद्राच्या कामगिरीवर भारतीय निशाणेबाजी संघ अवलंबून आहे. मागील काही स्पर्धांपासून सातत्याने चमकदार कामगिरी करून बिंद्राने भारतीय संघाच्या आशाही उंचावल्या आहेत. त्याच वेळी गतवर्षी तब्बल ७ आंतरराष्ट्रीय पदके जिंकणारा जीतू रायही कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. तर बिंद्रानंतरचा बलाढ्य निशाणेबाज गगन नारंग याने अमेरिकेत झालेल्या आयएसएसएफ रायफल आणि पिस्तूल विश्वकप स्पर्धेत कांस्य जिंकून भारताला तिसरा कोटा मिळवून दिला होता.अनुभवी बिंद्राने आपला दर्जा सिद्ध करताना भारताला चौथा कोटा मिळवून दिला. तर अपूर्वी, गुरप्रीत सिंग, प्रकाश नाजंप्पा, चैन सिंग आणि मेराज यांनी देखील आॅलिम्पिक तिकीट पक्के केले. त्याच वेळी दखल घेण्याची बाब म्हणजे लंडन आॅलिम्पिक रौप्यविजेता विजय कुमार, जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल निशाणेबाज मानवजितसिंग संधू आणि हीना सिद्धू, संजीव राजपूर व आयोनिका पाल या कसलेल्या निशाणेबाजांना अजून आॅलिम्पिक कोटा मिळवण्यात अपयश आले आहे. (वृत्तसंस्था)
युवांसह अनुभवी खेळाडूंनी साधला यशाचा नेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2015 3:02 AM