अहमदनगर : यापूर्वीचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरलेला एकही मल्ल या वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आखाड्यात उतरला नाही़ तर मागील उपमहाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी सुनील साळुंखे व नंदू आबदार या दोघांचाही अनपेक्षित पराभव झाला़ विशेष म्हणजे विजयाच्या उंबरठ्यावर असतानाच प्रशिक्षकाचा चुकीचा सल्ला व त्यामुळे गाफिल झालेला नंदू आबदार आश्चर्यकारकरित्या चितपट झाला़महाराष्ट्र अजिंक्यपद केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा नंदू आबदार (गादी विभाग) व मुंबईचा सुनील साळुंखे (माती विभाग) यांनी तिसऱ्या फेरीपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते़ दोघेही उपमहाराष्ट्र केसरीचे मानकरी असल्यामुळे या वर्षी दोघांपैकीच एक महाराष्ट्र केसरी ठरेल, अशी शक्यता जाणकार व्यक्त करीत होते़ मात्र, बीडच्या गोकुळ आवारे याने उपमहाराष्ट्र केसरी सुनील साळुंखे याला तिसऱ्या फेरीत पराभूत केले़ गोकुळ आवारे हा गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वजन गटातील विजेता तर सुनील साळुंखे हा गेल्या वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी होता़ त्यामुळे या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते़ या लढतीत पहिल्या हाफमध्ये गोकु ळने दुहेरी पट काढून दोन गुणांची कमाई केली़ तर पहिल्या हाफमध्ये साळुंखे याला एकही गुण मिळविता आला नाही़ दुसऱ्या हाफच्या प्रारंभीच साळुंखे याने दुहेरीपट काढून दोन गुणांची कमाई केली़ दोघांच्या गुणांची बरोबरी झालेली असताना प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती़ गोकुळने भारंदाज, दुहेरीपट काढून साळुंखेवर विजय मिळविला़शनिवारी सकाळच्या सत्रात पुण्याच्या महेश मोहोळ (ग्रीकोचा सुवर्णपदक विजेता) व नंदू आबदार यांच्यामध्ये लढत झाली़ नंदूने प्रारंभीच एकेरी पट काढून दोन गुणांची कमाई केली़ त्यामुळे महेशने आक्रमक खेळ करीत भारंदाजवर चार गुण मिळविले़ दोघांचेही प्रशिक्षक जोर-जोरात सल्ले देत होते़ महेशची आक्रमकता पाहून नंदू आबदार प्रशिक्षकाच्या सांगण्यानुसार खेळू लागला, ते पाहून प्रशिक्षकालाही चेव आला़ नंदूने महेशला भारंदाज लावला होता़ येथे नंदूला किमान चार गुणांची किंबहुना विजयाची संधी होती़़ सर्वांचे श्वास रोखले होते़़आणि प्रशिक्षक जोर-जोरात नंदूला सल्ला देत होते़ त्यावेळी नंदूने प्रथम प्रशिक्षकाकडे पाहिले व नंतर पंचांकडे पाहिले़ व्हिसल वाजलेली नव्हती आणि नंदू गाफिल झाला होता़ नेमकी हीच संधी साधून महेशने नंदूला चितपट केले़ आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला़ पराभूत नंदूही प्रशिक्षकावर चिडला़ (क्रीडा प्रतिनिधी)
प्रशिक्षकानेच हरविले नंदू आबदारला
By admin | Published: December 28, 2014 1:02 AM