नवी दिल्ली : डोपिंग प्रकरणामुळे नरसिंग यादवचे रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न सोमवारी जवळजवळ संपुष्टात आले. मला अडकवण्यासाठी या कटात ‘साई’चे (स्पोटर््स अथॉरिटी आॅफ इंडिया) अधिकारी सामील असल्याचा आरोप नरसिंगने केल्यामुळे या प्रकरणाला सोमवारी वेगळे वळण मिळाले आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाने या प्रकरणात नरसिंगला पाठिंबा दिला आहे.नरसिंग व त्याच्यासह रूममध्ये असलेला संदीप यादव बंदी असलेले अॅनाबॉलिक स्टेरॉईड मिथाएंडिनोनसाठी पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतरच्या दिवशी भारतीय कुस्ती महासंघाने नरसिंगची पाठराखण करताना त्याला रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी केलेला हा कट असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांनी सोमवारी सांगितले, की नरसिंगने लिखित तक्रार केली असून त्यात सोनीपत साई सेंटरच्या एका अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख करीत काही अन्य जणांवर आरोप केले आहेत. त्यात काही खेळाडूंचाही समावेश आहे. सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ‘‘नरसिंग यादवने १९ जुलै रोजी डब्ल्यूएफआयला लिखित तक्रार केली. त्यात साईच्या एका अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख आहे. त्यात काही खेळाडूंसह काही अन्य व्यक्तींवरही आरोप करण्यात आले आहेत. महिनाभराच्या कालावधीत नरसिंगची तीनदा डोप चाचणी घेण्यात आली, हे संशयास्पद आहे. त्याचसोबत त्याच्या रूममध्ये असलेला सहकारी संदीप यादव हासुद्धा बंदी असलेल्या पदार्थासाठी पॉझिटिव्ह आढळला आहे.’’डोपिंगमध्ये अडकलेल्या नरसिंगने आज या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, डोपिंगमध्ये दोषी आढळलेला मल्ल नरसिंग यादव याला रिओ आॅलिम्पिकला पाठविण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. स्वत:चा बचाव करण्याची त्याला पुरेपूर संधी दिली जाईल, असे क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सोमवारी स्पष्ट केले. सिंग यांनी सांगितले, की नरसिंगची तक्रार क्रीडा मंत्रालयाकडे पाठविण्यात आली आहे. सरकारने हे प्रकरणा गांभीर्याने घेतले असून त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मी विश्व कुस्ती महासंघ (फिला) आणि नाडा या संस्थांना या कटाबाबत माहिती दिली आहे. मी सातत्याने विश्व कुस्ती महासंघाच्या संपर्कात असून या प्रकरणातील घडामोडींबाबत त्यांना माहिती देत आहे. कटाचा बळी ठरला नरसिंग : बृजभूषणरिओ आॅलिम्पिकमध्ये पदकाची आशा मानल्या जात असलेला नरसिंग यादव डोप चाचणीमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्याची पाठराखण करताना भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांनी नरसिंगला कट रचून अडकवण्यात आल्याचे म्हटले आहे. ब्राझीलच्या रिओमध्ये ५ ते २१ आॅगस्ट या कालावधीत आयोजित आॅलिम्पिक स्पर्धेत नरसिंग यादव ७४ किलो वजन गटात कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार होता. नरसिंग बंदी असलेले स्टेरॉईड सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याला आॅलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. यापूर्वी नरसिंग यादव आणि याच वजन गटात दोनदा आॅलिम्पिक पदकाचा मानकरी ठरलेला मल्ल सुशीलकुमार यांच्यादरम्यान रिओमध्ये सहभागी होण्यासाठी वाद झाला होता. डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष बृजभूषण म्हणाले, ‘‘माझ्या मते नरसिंग कटाचा बळी ठरला आहे. तो निर्दोष असून त्याला अडकविण्यात आले आहे. तो रिओ स्पर्धेत सहभागी व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरसिंग यादव डोपिंग प्रकरणाचा भारतीय कुस्ती महासंघाकडे (डब्ल्यूएफआय) अहवाल मागितला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वादग्रस्त प्रकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्याकडे अहवाल मागितला आहे.
नरसिंगचा ‘साई’वर संशय
By admin | Published: July 26, 2016 3:02 AM