- रवी शास्त्री लिहितो़...स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असताना सुनील नारायणने सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. नारायणने बंदूक लोड केल्याचे दिसून येत आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात त्याला आतापर्यंत अचूक नेम साधता आला नसला किंवा फलंदाज त्याच्या नजरेला नजर भिडवत खेळत असले तरी किंवा त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली तरी गेल्या लढतीत मात्र त्याने सामन्याचे चित्र बदलले. हैदराबादविरुद्धच्या लढतीत सुनीलमध्ये पुन्हा पूर्वीची झलक बघायला मिळाली. ‘वॉर्नर अॅण्ड कंपनी’ त्याच्या जाळ्यात अडकली. त्याला पूर्वीची लय गवसली असून आज, बुधवारी दिल्लीमध्ये खेळल्या जाणाऱ्या एलिमिनेटर लढतीत त्याला गोलंदाजी करताना बघण्याची उत्सुकता आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात गेल्या लढतीचा अपवाद वगळता सुनीलमध्ये आपण ओळखतो त्या गोलंदाजाची झलक दिसली नाही. तो बदललेल्या शैलीमध्ये भेदक वाटला नाही. तो पूर्वी फलंदाजांवर वर्चस्व गाजवत होता. सुनीलमध्ये पूर्वीची भेदकता नाही आणि फलंदाजांना हे समजण्यासाठी केवळ एक-दोन लढती पुरेशा ठरल्या. त्यामुळे त्याच्याविरुद्धआक्रमक पवित्रा स्वीकारताना चेंडू प्रेक्षक गॅलरीमध्ये भिरकावण्यास सुरुवात झाली. गंभीरला याची कल्पना आली आणि त्याने नारायणला दडपण न बाळगण्याचा सल्ला दिला. योग्य वेळी त्याचे फळ मिळाल्याचे दिसून येत आहे. सुनील नारायणच्या अपयशामुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कोलकाता संघाची कामगिरी संमिश्र ठरली. या वेळी संघाला अन्य पर्वांच्या तुलनेत अधिक सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. सुनीलला सूर गवसल्यामुळे हैदराबाद संघाला नाणेफेक होईपर्यंत संघाचा समतोल साधण्याबाबत चिंता राहील. रसेलच्या अनुपस्थितीचा फटका बसलेल्या कोलकाता संघाला सुनीलला सूर गवसल्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. केकेआर संघासाठी युसूफ पठाणची कामगिरीही दिलासा देणारी बाब आहे. कोलकाता संघ इन्व्हेस्टिगेटिव्ह संघाची आठवण देतो. ते अचूक प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तर कसे मिळवायचे, याची त्यांना चांगली कल्पना असते. इंटरॉगेशन रूममध्ये या संघाला सामोरे जाणे सोपे नसते. हैदराबाद संघाला यापूर्वीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. संघाची गोलंदाजीची बाजू थोडी कमकुवत झाल्याचे दिसून आले. संघाला नेहराची उणीव भासत आहे. युवराजची पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याची रणनीती योग्य आहे किंवा नाही, याबाबत आपण काही सांगू शकणार नाही. हैदराबाद संघाला वॉर्नरकडून चांगल्या खेळीची गरज आहे. हैदराबाद संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यास पसंती देईल आणि पॉकेट डायनामाइट (वॉर्नर) डावाच्या अखेरपर्यंत खेळपट्टीवर असावा, अशी त्यांना आशा राहील. (टीसीएम)
नारायणला योग्य वेळी सूर गवसला
By admin | Published: May 25, 2016 2:58 AM