पोर्ट आॅफ स्पेन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज सुनील नारायण याची नवीन गोलंदाजी शैली नियमांनुसार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सुनील नारायण याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट व विशेषत: वर्ल्डकप ट्वेंटी-२० स्पर्धेत पुनरागमन करण्याच्या आशेला बळ मिळाले आहे. नारायण याचा वर्ल्डकपसाठी कॅरेबियन संघात समावेश करण्यात आला आहे.नारायणची याआधीची गोलंदाजीची शैली आयसीसीने बेकायदेशीर ठरवली होती. त्यानंतर त्याला गोलंदाजी शैली सुधारण्याचा सल्ला देण्यात आला होता. कॅरेबियन स्पिनरच्या गोलंदाजी शैलीवर लक्ष ठेवणारे स्थानिक मॅच रेफरी मायकल रघुनाथ आणि क्रिकेट प्रशासक जेफली गुईलेन यांनी सुनीलच्या नव्या शैलीवर समाधान व्यक्त केले. नारायण त्याच्या गोलंदाजी शैलीच्या सुधारणेसाठी स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. रघुनाथ नारायणच्या दोन सामन्यांत मॅच रेफ्री म्हणून होते आणि नारायणच्या शैलीविषयी कोणताही नकारात्मक अहवाल मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, गेल्या नोव्हेंबर महिन्यात नारायणला बांगलादेश प्रिमीयर लीगमध्ये त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे स्पर्धेबाहेर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे वेस्ट इंडीज आणि श्रीलंका मालिकेदरम्यानदेखील नारायणच्या गोलंदाजी शैलीविषयी तक्रार करण्यात आली होती. भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्डकपसाठी नारायण याचा वेस्ट इंडीज संघात समावेश करण्यात आला आहे.
नारायणची नवी शैली नियमानुसार : आयसीसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2016 3:44 AM