बंगळुरु : सुनील नरेन आणि ख्रिस लीन या धडाकेबाज सलामीवीरांनी केलेल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा फडशा पाडताना ६ विकेट्सने ‘रॉयल’ विजय मिळवला. केकेआरने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेत प्लेआॅफमधील जागा जवळपास निश्चित केली आहे. बंगलोरला प्रथम ६ बाद १५८ धावांमध्ये रोखल्यानंतर कोलकाताने १५.१ षटकांतच ४ बाद १५९ धावा चोपल्या. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताचा आक्रमक फटकेबाजीतून बँगलोर अक्षरश: होरपळून निघाले. सुनिल नरेनने १७ चेंडंूत ६ चौकार व ४ षटकार ठोकताना ५४ धावांची वादळी खेळी केली. दुखापतीतून सावरलेल्या लीनने दुसऱ्या टोकावरून फटकेबाजी करताना २२ चेंडंूत ५ चौकार व ४ षटकारांसह ५० धावांचा तडाखा दिला. यामुळे बँगलोरची दोन्ही बाजूने चांगलीच धुलाई झाली. या दोघांच्या आक्रमक पवित्र्यापुढे चेंडू नेमका कुठे टाकायचा हाच प्रश्न गोलंदाजांना पडला. समोर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला सीमापार धाडून नरेन - लीन यांनी कोलकाताच्या विजयाची केवळ औपचारिकताच शिल्लक ठेवली. सातव्या षटकात नरेन व त्याच्या पुढील षटकात लीन बाद झाल्यानंतर कोलकाताच्या धावसंख्येचा वेग काहीसा कमी झाला. परंतु, या दोघांनी संघासाठी आपले काम पार पाडले होते. तत्पूर्वी, पुन्हा एकदा बँगलोरची ‘रॉयल’ फलंदाजी ढेपाळली. सलामीवीर मनदीप सिंग (४३ चेंडूंत ५२) आणि ट्रॅव्हिस हेड (४७ चेंडूंत नाबाद ७५) यांच्यामुळै बँगलोरला समाधानकारक मजल मारता आली. ख्रिस गेल (०), कर्णधार विराट कोहली (५), एबी डिव्हिलियर्स (१०), केदार जाधव (८) यांचा फ्लॉप शो कायम राहिल्याने बँगलोरचा पराभव कायम राहिला. (वृत्तसंस्था)वेगवान अर्धशतकाचा विक्रम...सुनील नरेनने धुवाधार फटकेबाजी करताना आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. २०१४ मध्ये कोलकाताच्याच युसुफ पठाणने हैदराबादविरुद्ध १५ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. नरेनने याच विक्रमाची बरोबरी करताना बँगलोरच्या प्रत्येक गोलंदाजाला चांगलेच बदडले.पॉवर प्ले विक्रम....नरेन - लीन यांनी कोलकाताला पहिल्या ६ षटकांत १०५ धावांची जबरदस्त सलामी दिली. या जोरावर आयपीएल इतिहासात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा उभारण्याचा विक्रम कोलकाताने रचला. पुन्हा एकदा बँगलोर विजयापासून दूर राहिले तगडी फलंदाजी आणि स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघाला यंदाच्या मोसमात १३ सामन्यांतून केवळ २ विजय मिळवता आले आहेत. दुसरीकडे, कोलकाताने सलग २ पराभवानंतर धमाकेदार पुनरागमन करताना दणदणीत विजयाची नोंद केली. संक्षिप्त धावफलक :रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : २० षटकांत ६ बाद १५८ धावा. (ट्रॅव्हिस हेड ७५, मनदीप सिंग ५२; उमेश यादव ३/३६, सुनील नरेन २/२९) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १५.१ षटकांत ४ बाद १५९ धावा. (सुनील नरेन ५४, ख्रिस लीन ५०; पवन नेगी २/२१).
नरेन-लीन यांचा झंझावात
By admin | Published: May 08, 2017 12:47 AM