-सुशील कुमार लिहितो...रिओमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंचा उत्साह मनोधैर्य उंचावणाऱ्या अन्य भारतीय चाहत्यांप्रमाणे मीसुद्धा टीव्हीला चिटकून बसलो आहे. आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणे म्हणजे खेळाडूंचे स्वप्न साकार झाल्यासारखे असते, हे मी स्वत:च्या अनुभवावरून सांगू शकतो. येथे पदक पटकावण्याचा अनुभव तर मी शब्दात कथन करू शकत नाही. भारतीय पथकाची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नाही, हे स्वीकारावेच लागेल. त्यामुळे भारताला अद्याप पदकाचे खाते उघडता आलेले नाही. चाहत्यांना अभिनव बिंद्रा, जीतू राय, हिना सिद्धू, दीपिका कुमारी आणि बोंबायला देवी यांच्यासारख्या खेळाडूंकडून मोठी अपेक्षा होती आणि त्यांना पराभूत होताना बघणे निराशाजनक होते. आॅलिम्पिकमध्ये कडवी प्रतिस्पर्धा असते आणि रिओमध्ये यापेक्षा वेगळे बघायला मिळाले नाही. आपले खेळाडू प्रतिभावान आहेत, पण आपण कुठेतरी तांत्रिक बाबीमध्ये चूक करीत आहोत, असे माझे वैयक्तिक मत आहे. आपण रिओसाठी चांगली तयारी केली होती, पण आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे दडपण अधिक असते. मला माझ्या सहकारी मल्लांच्या लढती प्रारंभ होण्याची प्रतीक्षा आहे. योगेश्वरसह मल्लांचे चांगले पथक रिओमध्ये सहभागी झालेले आहे. केवळ योगेश्वरच नाही तर नरसिंग, बबिता, विनेश, संदीप सर्वच मल्ल रिओमध्ये चमकदार कामगिरी करतील, पण आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही, अशी आशा आहे. योगेश्वर शानदार फॉर्मात असून कारकिर्दीतील चौथ्या आॅलिम्पिकमध्ये सहभागी झाला आहे. तो अनुभवी असून कुठल्याही प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यास सक्षम आहे. कधीच पराभव न स्वीकारण्याची वृत्ती योगेश्वरला कडवा प्रतिस्पर्धी म्हणून ओळख निर्माण करण्यास पुरेशी आहे. लंडनमध्ये मी असेच काही अनुभवले होते. नरसिंगची लढत बघण्याचीही उत्सुकता आहे. तो जागतिक दर्जाचा मल्ल असून त्याची ही दुसरी आॅलिम्पिक स्पर्धा आहे. लंडन आॅलिम्पिकच्या अनुभवाचा त्याला लाभ मिळेल. मी योगेश्वर व नरसिंग या दोघांसोबत सराव केला असून त्यांच्यात पदक पटकावण्याची योग्यता आहे, याची मला कल्पना आहे. सर्व मल्लांना माझा सल्ला आहे की, त्यांनी पूर्ण क्षमतेने खेळ करावा. पूर्ण भारत देश त्यांच्या पाठीशी आहे. खेळाडूसाठी हे सर्वांत प्रतिष्ठेचे व्यासपीठ असून खेळाडूंनी कडव्या लढतीसाठी सज्ज असायला हवे. भारतीय मल्लांचे पथक दमदार असून भूतकाळ विसरुन वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवस नवा असतो. ज्यावेळी रिंगमध्ये असतो त्यावेळी आपण एकटे असतो आणि स्वबळावर विजय मिळवावा लागतो. भारतीय मल्ल रिंगमध्ये उतरण्यापूर्वी भारताचे पदकाचे खाते उघलेले राहील, असा मला विश्वास आहे. पण, असे घडले नाही तर भारतीय मल्ल हे चित्र बदलतील. मल्लांकडून अधिक नाही, पण किमान एका पदकाची तर आशा करता येईल. जय हिंद! (टीसीएम)
नरसिंग, योगेश्वरच्या लढतींची प्रतीक्षा
By admin | Published: August 15, 2016 5:51 AM