नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकपूर्वी डोपिंग टेस्टमध्ये पकडला गेलेला मल्ल नरसिंग यादवची चौकशी राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीने (नाडा) गुरुवारी पुर्ण केली, परंतु या चौकशीचा निकाल शनिवारी किंवा सोमवारी जाहीर करण्यात येणार असल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या प्रतीक्षेत वाढ झाली आहे.राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नरसिंगने दोन वेळा आॅलिम्पिक पदक जिंकलेल्या सुशीलकुमार विरुद्ध न्यायालयीन लढाई जिंकताना आॅलिम्पिक प्रवेश मिळवला होता. मात्र, डोपिंग टेस्टमध्ये अडकल्याने आता त्याचे आॅलिम्पिक खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. दरम्यान, ‘नाडा’च्या तपास समितीपुढे बुधवारी सुरू झालेली चौकशी गुरुवारी पूर्ण झाली. चौकशीचे निर्णय आपल्याकडे सुरक्षित ठेवताना याचा निकाल शनिवारी किंवा सोमवारी घोषित करण्यात येईल, असे ‘नाडा’ने स्पष्ट केले. याआधी बुधवारी ‘नाडा’ तपास समितीपुढे नरसिंगच्या उपस्थितीत तब्बल साडेतीन तास चौकशी झाल्यानंतर ही चौकशी थांबविण्यात आली. गुरुवारी पुन्हा एकदा चौकशी सुरू झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपआपली बाजू मांडली. नरसिंगचे वकील विदूषत सिंघानिया यांनी सांगितले की, ‘‘नाडापुढे नरसिंगची पूर्ण बाजू मांडण्यात आली असून, अजूनपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबतची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. नरसिंगनेही आरोप लावला आहे की, त्याच्याविरोधात कोणीतरी कट रचला असून, त्याच्या खाण्या-पिण्यात काहीतरी मिसळण्यात आले.’’नरसिंगने सांगितले होते की, त्याच्या फूड सप्लिमेंट आणि पाणीमध्ये काहीतरी मिसळण्यात आले होते. शिवाय भारतीय कुस्ती महासंघानेही नरसिंगची बाजू घेताना नरसिंगविरुद्ध कट रचण्यात आला असल्याचे सांगितले होते. दरम्यान, नरसिंगने सोनीपत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, क्रीडा मंत्रालयालाही पत्राद्वारे घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. दुसरीकडे, नरसिंगने आपल्या शरीरात प्रतिबंध असलेल्या पदार्थांबाबतीत जे पुरावे सादर केले, ते अयोग्य असल्याचे ‘नाडा’च्या वकिलांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
नरसिंग यादवचा फैसला लांबणीवर
By admin | Published: July 29, 2016 3:16 AM