नवी दिल्ली : आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिट दीपा मलिक यांना यंदाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त त्यांना आज या पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले. त्यांच्यासह क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि पूनम यादव यांनाही यंदा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.
बजरंगला 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019मध्ये पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केले होते. कुस्ती महासंघाने या पुरस्कारासाठी विनेश फोगाटच्या नावाची शिफारस केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या त्बिलिसी ग्रां प्रि स्पर्धेत त्यानं इराणच्या पेइमन बिब्यानीला ( 65 किलो ) पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते. तत्पूर्वी त्यानं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले होते. बजरंगच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदकं आहेत. त्यानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर गतवर्षी सुवर्णपदक पटकावले.