- ललित नहाटाचेन्नई : महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुषांच्या दोन्ही संघांनी वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत विजय नोंदवला. पुरुषांच्या संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात उत्तर प्रदेशवर ५२-४८ असा विजय मिळवला, तर महिला संघाने राजस्थानवर ८२-७१ अशी मात केली.चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र संघाने आपली आगेकूच कायम राखली. महाराष्ट्र पुरुषांच्या संघाने पहिल्या क्वॉर्टरमध्ये १०-६ अशी आघाडी घेतली. महाराष्ट्राचा कर्णधार एडवीन याने पहिल्या हाफपर्यंत संघाला उत्तर प्रदेशविरोधात २२-१५ अशी आघाडी मिळवून दिली.मात्र दुसºया हाफमध्ये संघ काहीसा मागे पडला होता. मात्र दबावातही महाराष्ट्र संघाने ५२-४८ असा विजय मिळवत स्पर्धेत टिकून राहण्याच्या आशा कायम राखल्या.महाराष्ट्र संघाच्या अश्रफ सिद्धिकी याने १७, तर एडवीन इरवीन याने १० गुणांची कमाई केली. उत्तर प्रदेशच्या विक्रम परमार याने १४, तर पुलकित याने ११ गुणांची कमाई करत पराभवाचे अंतर कमी केले. महाराष्ट्र मुलींच्या संघाने राजस्थानविरोधात राखीव खेळाडूंना खेळवले. त्यांनी पहिल्या क्वॉर्टरमध्ये २३-१४ अशी आघाडी घेतली.हीच आघाडी पहिल्या हाफमध्ये ४५-४० अशी होती. दुसºया हाफमध्ये राजस्थानच्या खेळाडूंनी चांगला प्रतिकार केला. मात्र अखेरीस महाराष्ट्र संघाने ८२-७१ असा विजय मिळवला.महाराष्ट्रच्या शिरीन लिमये (२१ गुण), साक्षी अरोरा (१४ गुण) आणि कॅरिना मेनेझेस (१२ गुण) यांनी चांगला खेळ केला. तर निशा शर्मा (३२ गुण) आणि कमलेश तरागी (१७ गुण) यांनी राजस्थानकडून आपला खेळ दाखवला. शिरीन लिमये हिने आपल्या खेळाने महाराष्ट्राला विजय मिळवून दिला.महाराष्ट्र मुलींच्या संघाचा साखळी फेरीतील अखेरचा सामना तेलंगणाविरोधात उद्या होणार आहे.
राष्ट्रीय बास्केटबॉल : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचा विजय, पुरुष संघाचा चुरशीच्या सामन्यात उत्तर प्रदेशवर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 1:21 AM