रोहित नाईक, विशाखापट्टणम : अंतिम क्षणापर्यंत रोमांचक झालेल्या लढतीत पश्चिम बंगलाच्या शिबब्रता दासगुप्ता याने विदर्भाच्या विजय भोयार याच्यावर मात करत फेडरेशन चषक मिस्टर इंडिया किताब पटकावला. त्याचवेळी स्पर्धेत पश्चिम बंगालने सर्वाधिक १५ पारितोषिकांवर कब्जा करताना सांघिक जेतेपदावर नाव कोरले. पश्चिम बंगालच्याच मंगला सेन हिने ‘मिस इंडिया’ किताब पटकावला.
इंडियन बॉडिबिल्डींग फेडरेशनच्या (आयबीबीएफ) वतीने प्रथमच विशाखापट्टणम येथील गुरजाडा कलाक्षेत्रम येथे राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेची चुरस रंगली. पहिल्यांदाच आयोजन झालेल्या या स्पर्धेत पश्चिम बंगालच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व राखले. त्याचप्रमाणे विदर्भ आणि महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही अनुक्रमे ४ व ३ पुरस्कार पटकावत आपली छाप पाडली. ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’ या अंतिम फेरीमध्ये ८५ हून अधिक किलोवजनी गटाचा विजेता विजय भोयार (विदर्भ), ८५ किलो गटाचा विजेता पिंटू देढा (दिल्ली) आणि ८० किलो गटाचा विजेता शिबब्रता दासगुप्ता यांच्यामध्ये जेतेपदाची चुरस रंगणार होती. ऐनवेळी प्रकृती ढासळल्याने देढाने स्पर्धेतून माघार घेतली आणि विजय व दासगुप्ता यांच्यात चुरस रंगली.
दोघांनी तोडिस तोड सादरीकरण करताना परिक्षकांनाही घाम फोडला. यामुळे या दोघांमध्ये अखेरच्या क्षणी कम्पेरिझन घेण्यात आली. यामध्ये दासगुप्ता वरचढ ठरल्याने विजयला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
महिलांमध्येही पश्चिम बंगालचेच वर्चस्व राहिले. मंगला सेन हिने महाराष्ट्राच्या मिथिला नायरचे कडवे आव्हान परतावून लावत ‘मिस इंडिया’ इताब उंचावला. त्याचप्रमाणे, ‘मेन्स फिटनेस’ या विशेष गटामध्ये दिल्लीच्या आकाशने बाजी मारत जेतेपद पटकावले. तामिळनाडूच्या एमडी असनाथ याने दुसरे, तर दिल्लीच्याच संदीपने तिसरे स्थान मिळवले. शौनक आणि आकाश अहिरे या महाराष्ट्राच्या खेळाडूंना अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.
------------------------
स्पर्धेचा निकाल :
चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स :
मिस्टर इंडिया : शिबब्रता दासगुप्ता (प. बंगाल)
मिस इंडिया : मंगला सेन (प. बंगाल)
वजनी गटनिहाय निकाल :
५५ किलो : १. निलेश राऊत (विदर्भ), २. पी. फलगना राव (आंध्र प्रदेश), ३. इंद्रनील बॅनर्जी (प. बंगाल).
६० किलो : १. के. श्रीनू (आंध्र प्रदेश), २. मोहम्मद आमिर (महाराष्ट्र), ३. एस. के. रेहमान (आंध्र प्रदेश).
६५ किलो : १. सुनील मैती (प. बंगाल), २. सोनू रॉय (प. बंगाल), ३. निलादरी हलदर (प. बंगाल).
७० किलो : १. कौशिक मनिक (प. बंगाल), २. बरनावा बिस्वास (प. बंगाल), ३. अभिजीत मोंडल (प. बंगाल).
७५ किलो : १. पलाशधाली (प. बंगाल), २. सद्दाम हुसैन (झारखंड), ३. आकाश (दिल्ली).
८० किलो : १. शिबब्रता दासगुप्ता (प. बंगाल), २. समीर बाबू (केरळ), ३. संदीप (दिल्ली).
८५ किलो : १. पिंटू देढा (दिल्ली), २. रणजीत डे (प. बंगाल), ३. आकाश दुबळकर (विदर्भ).
८५ हून अधिक किलो : १. विजय भोयार (विदर्भ), २. रवी कुमार (दिल्ली), ३. सुभेंदू करमाकर (प. बंगाल)