नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविणाऱ्या खेळाडूंसाठी राष्ट्रीय शिबिरे या महिन्याच्या शेवटी टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची योजना तयार करण्यात येत आहे. पण अन्य खेळाडूंना मात्र सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी रविवारी सांगितले.
रिजिजू म्हणाले, लॉकडाऊनमुळे त्यांच्या मंत्रालयाला भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) केंद्रांमध्ये सराव शिबिरे सुरू करता आलेली नाही. फिक्कीचे वेबिनार ‘कोरोना आणि खेळ : द चॅम्पियन्स स्पिक’मध्ये बोलताना रिजिजू म्हणाले, ‘शिबिरे योजनाबद्ध पद्धतीने सुरू होतील. सुरुवातीला आम्ही एनआयएस पतियाळा व बेंगळुरूच्या साईमध्ये सरावाला सुरुवात करणार आहोत. कारण येथे खेळाडू थांबलेले आहेत. या महिन्याच्या शेवटी बेंगळुरू व पतियाळा येथे सराव सुरू करण्याची आशा आहे.’ ते पुढे म्हणाले,‘आपण आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविलेल्या आणि भविष्यात पात्रता मिळविणाºया खेळांचे सराव शिबिरे असतील.’
राष्ट्रीय शिबिरे मार्चच्या दुसºया आठवड्यापासून स्थगित करण्यात आली. त्यावेळी कोविड-१९ महामारीचे भारतात रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली होती. क्रीडा मंत्री म्हणाले, ‘मी ३ मेपासून साई केंद्रांमध्ये खेळाडूंच्या सरावाला सुरुवात करण्याचा विचार करीत होतो. पण आता या माहिन्याच्या शेवटी योजनाबद्ध पद्धतीने सरावाला सुरुवात करावी लागेल. कारण आपात्कालीन नियमामध्ये क्रीडा स्पर्धांना कुठली सूट नसते. आमचे मंत्रालय आवश्यक सेवेत येत नाही.’
दरम्यान, रिजिजू यांनी स्पष्ट केले की, जे खेळाडू आॅलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या शर्यतीत नाहीत त्यांना सराव सुरू करण्यासाठी सप्टेंबर- आॅक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. ते म्हणाले, ‘नजीकच्या कालावधीत कुठल्या स्पर्धात्मक सामन्यांची आशा नाही.’ दरम्यान, भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी शनिवारी म्हटले होते की, ते सरकारला राष्ट्रीय शिबिरात समावेश असलेल्या खेळाडूंना बाहेर प्रशिक्षणासाठी परवानगीबाबत विचारणा करणार आहेत. पण रिजिजू यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले जाणार आहे. भारतीय अॅथ्लेटिक्स महासंघ आणि एआयएस पतियाळाच्या काही खेळाडूंनी क्रीडा मंत्र्यांना बाहेर सराव करण्यास परवानगी देण्याबाबत लिहिले होते. क्रीडा मंत्री म्हणाले, परिस्थिती सामान्य झाली तरी खेळाडूंसह लोकांना आपल्या दिनचर्येमध्ये मोठे बदल करावे लागतील.’