भोपाळ : ३८ वी कुमार–मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो स्पर्धा भोपाळ, मध्य प्रदेश येथे सुरू असून या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपउपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश करताना कुमारांमध्ये गोव्यावर तर मुलींमध्ये तेलंगणावर दणदणीत विजय साजरा केला.
आज झालेल्या कुमारांच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने गोव्याचा २४-०२ असा एक डाव २२ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात गोव्याने दुसर्या डावात ४:१० मि. संरक्षण केल्यावर डाव सोडून दिला. या सामन्यात राहुल मंडलने ४:२० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, दिलीप खंडवीने ३:०० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला. दुसर्या डावात निहार दुबळेने नाबाद ४:१० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले तर संदेश जाधव, प्रज्योत जगदाळे व आयुष गुरवने तीन-तीन गडी बाद करत गोव्यावर मोठा विजय साजरा केला. गोव्याच्या टी. तेजस व के. विशाल यांनी एक-एक गडी बाद केला.
आज झालेल्या मुलींच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने तेलंगणाचा १७-०७ असा एक डाव १० गुणांनी धुव्वा उडवला. कर्णधार रेश्मा राठोडने ४:१० मिनिटं संरक्षण करतानातीन बळी घेतले, प्राजक्ता पवारने २:३० मिनिटे संरक्षण करताना एक बळी घेतला, अश्विनी मोरेने नाबाद १:५०, २:५० मिनिटे संरक्षण करताना एक बळीची नोंद केली व दीक्षा सोनसुरकरने २:२० मिनिटे संरक्षण करताना दोन बळी घेतले, दिव्या जाधवने १:४० मिनिटे संरक्षण करताना तीन बळी घेतले. तेलंगणाच्या एन. श्रवंतीने १:१० मिनिटे संरक्षणकेल व डी. रोहील्हाने दोन बळी घेतले.