- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - देशभरातील शाळा महाविद्यालयांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेला मुंबईतून सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय आलिंपिक समितीच्या सदस्या नीता अंबानी यांच्या युथ स्पोर्ट्स या बॅनर खाली शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देत खेळात करियर घडवण्यासाठी ‘स्टुडंट अॅथलिट’ कार्यक्रमही राबवण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्पर्धेतंर्गत मुंबई विभागात सीनियर गटातील मुलींच्या सामन्यात एच आर महाविद्यालय विरुद्ध विल्सन महाविद्यालय आमने-सामने आले. आगामी तीन महिन्यात मुंबई आणि उपनगरामधून ६०० हून अधिक संघ तयार करण्यात येणार आहे. त्या संघाचे पूर्व-चाचणी फेऱ्या लवकरच खेळवण्यात शहरातील विविध मैदानांवर खेळवण्यात येणार आहे.
मुंबईसह दिल्ली, गुवाहटी, कोची, गोवा, चेन्नई, पुणे आणि कोलकाता या शहरांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. ज्युनियर मुले, सिनियर मुले, सिनियर मुली आणि कॉलेज मुले अशा चार गटात दोन हजार शाळा-महाविद्यालय संघ सहभागी होणार आहेत. पूर्व फेऱ्यानंतर प्रत्येक शहर विजेता संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. फुटबॉलप्रमाणे युथ स्पोर्ट्स लवकरच फूटबॉल, बास्केटबॉल, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल अशा खेळांच्या माध्यमाने शाळा-महाविद्यालयांतीव खेळाडूां राष्ट्रीय स्पर्धेची संधी देणार आहे.