अहमदाबाद: सध्या अहमदाबाद येथ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा थरार रंगला आहे. स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रमहिला कबड्डी संघ शनिवारी ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेता ठरला आहे. संघाला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. नॅशनल चॅम्पियन हिमाचल प्रदेश संघाने विजेतेपदाचा बहुमान पटकावला. हिमाचल प्रदेश टीमने फायनलमध्ये महाराष्ट्रावर २७-२२ ने मात केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र संघाकडून विजयासाठी आंतरराष्ट्रीय रेडर सोनाली शिंगटे आणि पुजा यादवने सर्वोत्तम कामगिरी केली.
मात्र संघाला अवघ्या पाच गुणांच्या पिछाडीने पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्र संघाने गटातील सामन्यात हिमाचलला धुळ चारली होती. याच पराभवाची परतफेड करताना हिमाचलने आता अंतिम फेरीत महाराष्ट्रावर मात केली. लक्षणीय बाब म्हणजे महाराष्ट्राच्या संघाच्या खात्यात पहिले पदक आले आहे. महाराष्ट्र महिला संघाने पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकाचा बहुमान पटकावला आहे. यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाची कामगिरी लक्षवेधी ठरली. संघाने विजयी मोहिम कायम ठेवताना यशस्वीपणे अंतिम फेरीचा पल्ला गाठला होता. स्नेहल शिंदेचे कुशल नेतृत्व, सोनाली शिंगटे, पुजा यांची सर्वोत्तम चढाई आणि अंकिता जगताप, रेखा यांच्या सुरेख पकडीच्या बळावर महाराष्ट्राला सामन्यागणिक विजयाची नोंद करता आली.
महिला खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद - संजय मोकळ, प्रशिक्षक महाराष्ट्र महिला संघाने बलाढ्य संघाला धुळ चारत अंतिम फेरी गाठली होती. यादरम्यान झालेल्या प्रत्येक सामन्यात महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद ठरली. त्यामुळे संघाला रौप्यपदकाचा बहुमान मिळवता आला. सुवर्णपदकासाठी संघाचा प्रयत्न काहीसा अपुरा पडला. मात्र, या पदकाने आमचा आत्मविश्वास दुणावला आहे, अशा शब्दात प्रशिक्षक संजय मोकळ यांनी उपविजेत्या महिला संघावर कौतुकाचा वर्षाव केला.