मुंबई : बलाढ्य महाराष्ट्राने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना, पुरुष व महिला गटात प्रत्येकी ७५ गुणांची कमाई करत, पाचव्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेच्या सांघिक जेतेपदावर कब्जा केला. विशेष म्हणजे, सलग तिस-यांदा जेतेपद पटकवताना महाराष्ट्राने दिमाखदार हॅट्ट्रिक नोंदवत आपला दबदबा राखला. त्याच वेळी महाराष्ट्राच्या धडाक्यापुढे कट्टर प्रतिस्पर्धी राजस्थान संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राजस्थानने पुरुष गटात ४०, तर महिला गटात ५० गुण मिळविले. अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (आयपा) वतीने आणि प्रथमच कर्नाटक राज्य पिकलबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली बंगळुरू येथील तेरापंथ समाज, भिक्षू धाम जैन प्रार्थना सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने ४ विजेतेपद पटकावत आपले वर्चस्व राखले. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात कुलदीप महाजनने झारखंडच्या सोनू कुमार विश्वकर्मा याचे आव्हान ११-७, ११-७ असे परतावत दिमाखदार जेतेपद पटकावले. महिला गटात अंतिम सामना महाराष्ट्राच्याच खेळाडूंमध्ये रंगला. यामध्ये वृशाली ठाकरेने बाजी मारताना पूजा वाघ हिला ११-२, ११-१ असे सहज नमविले. पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या अभिजीत मढभवी - सौमित्र कोरगावकर यांनी अपेक्षित सुवर्ण जिंकताना कट्टर प्रतिस्पर्धी राजस्थानच्या निखिल सिंग राजपूत-प्रशांत कलानी यांचा ११-९, ११-९ असा पराभव केला. त्याच वेळी मिश्र दुहेरीत अनुभवी अतुल एडवर्ड आणि युवा साक्षी बाविस्कर या तगड्या जोडीला सुवर्ण पदकासाठी झुंजावे लागले. मात्र, मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना अतुल - साक्षी यांनी राजस्थानच्या नीरज शर्मा - मेघा कपूर यांचा ११-४, ६-११, ११-८ असा पाडाव केला. - महिला दुहेरी गटामध्ये राजस्थानचे वर्चस्व राहिले. राजस्थानच्या नीतू शर्मा - मधुलीका या जोडीने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात दिव्या पवार - क्रितिका गिरी या मध्य प्रदेशच्या जोडीचा ११-३, ९-११, ११-४ असा पराभव केला.
राष्ट्रीय पिकलबॉल : महाराष्ट्राच्या जेतेपदाची हॅट्ट्रिक, पुरुष व महिला गटात राखला दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 9:54 PM