नवी दिल्ली : दरवर्षी २९ ऑगस्टला आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा यंदा थोड्या उशिराने आयोजित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर टोकियोमध्ये आता पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन होणार आहे. त्यामुळेच सरकारने निवड समितीला टोकियो पॅरालिम्पिक खेळाडूंनाही पुरस्कार सोहळ्यामध्ये समाविष्ट करण्यास सांगितले आहे.पॅरालिम्पिक स्पर्धांचे आयोजन टोकियोमध्ये २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान होईल. पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी निवड समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. मात्र, त्याचवेळी निवड प्रक्रिया सुरु होण्याआधी काही वेळ प्रतीक्षा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय युवा पुरस्कार सोहळ्यादरम्यान ठाकूर यांनी सांगितले की, ‘या वर्षासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती स्थापन करण्यात आली आहे; पण यंदा पॅरालिम्पिक स्पर्धाही होणार असल्याने आम्हाला यामध्ये पॅरालिम्पिक खेळाडूंनाही समाविष्ट करून घ्यायचे आहे.’५४ सदस्यांचा संघ रवानाक्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि भारतीय पॅरालिम्पिक समितीने आगामी टोकियो पॅरा लिम्पीक स्पर्धेसाठी गुरूवारी ५४ सदस्यांच्या संघाला औपचारीक निरोप दिला. भारत २४ ऑगस्ट ते पाच सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या पॅरालिम्पीक स्पर्धेत सहभागी होणार आहे.संघात देवेंद्र झाझरिया एफ ४६ भालाफेक, मरियप्पन थांगवेलू टी २३ उंच उडी, विश्व चॅम्पियन संदीप चौधरी एफ ६४ भाला फेक या पदक विजेत्या दावेदार खेळाडूंचा समावेश आहे.आमचे पॅरा ॲथलिट महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांचा आत्मविश्वास १३० कोटी भारतीयांना प्रेरणा देत आहे. त्यांच्या हिमतीपुढे मोठमोठी आव्हानेही झुकतील. खेळाडूंची संख्या गेल्या स्पर्धेपेक्षा तिप्पट आहे. त्यामुळे मला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. हे स्टार चांगली कामगिरी करतील.-अनुराग ठाकूर, क्रीडा मंत्री
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा उशीराने होणार साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 8:35 AM