नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्व चॅम्पियन भारोत्तोलक मीराबाई चानू यांना प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान केला, तर भालाफेकपटू नीरज चोपडासह २० खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.राष्ट्रपती भवनातील अशोका सभागृहात आयोजित कार्यक्रमात सर्वांची नजर कोहलीवर केंद्रित झाली होती. विराट हा सचिन तेंडुलकर (१९९७-९८) आणि महेंद्रसिंग धोनी (२००७) यांच्यानंतर खेलरत्न पुरस्काराचा मानकरी ठरलेला क्रिकेटपटू आहे. यापूर्वी २०१३ मध्ये अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या कोहलीची गेल्या काही वर्षांतील शानदार कामगिरीमुळे खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली.राष्ट्रपतींनी याव्यतिरिक्त द्रोणाचार्य पुरस्कार व ध्यानचंद पुरस्कारही प्रदान केले. शिस्तभंगाच्या मुद्यावर तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योत सिंग यांचे नाव द्रोणाचार्य पुरस्कारांच्या यादीतून वगळण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. जीवनज्योत यांनी याविरोधात प्रशिक्षकपदाचा राजीनामाही दिला आहे. जागतिक क्रमवारीत कसोटीमध्ये अव्वल स्थानावर असलेला फलंदाज कोहली गेल्या तीन वर्षांपासून शानदार फॉर्मात आहे. यापूर्वी २०१६-१७ मध्ये त्याला या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. कोहलीने आतापर्यंत ७१ कसोटी सामन्यांत ६,१४७ धावा आणि २११ वन-डेमध्ये ९,७७८ धावा केल्या आहेत. विराट पुरस्कार वितरण समारंभात पत्नी अनुष्का शर्माव्यतिरिक्त आई सरोज कोहली आणि भाऊ विकाससोबत आला होता. गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकल्यामुळे चानूची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली. तिने यंदा राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले. पण दुखापतीमुळे तिला आशियन गेम्समध्ये सहभागी होता आले नाही.राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना पदक आणि प्रशस्तीपत्र याव्यतिरिक्त ७.५ लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना छोट्या प्रतिमा, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख पुरस्कार देण्यात येतो. (वृत्तसंस्था)पुरस्कार विजेते खेळाडूराजीव गांधी खेलरत्न पुरस्कार : विराट कोहली आणि मीराबाई चानू.अर्जुन पुरस्कार : नीरज चोप्रा, जिन्सन जॉन्सन व हिमा दास (अॅथलेटिक्स), एन. सिक्की रेड्डी (बॅडमिंटन), सतीश कुमार (बॉक्सिंग), स्मृती मंदाना (क्रिकेट), शुभंकर शर्मा (गोल्फ), मनप्रीत सिंग, सविता (हॉकी), रवी राठोड (पोलो), राही सरनोबत, अंकुर मित्तल, श्रेयसी सिंग (नेमबाजी), मनिका बत्रा, जी. सथियान (टेबल टेनिस), रोहन बोपन्ना (टेनिस), सुमित (कुस्ती), पूजा काडिया (वुशु), अंकुर धामा (पॅरा-अॅथलेटिक्स), मनोज सरकार (पॅरा-बॅडमिंटन).द्रोणाचार्य पुरस्कार : सी. ए. कुट्टप्पा (बॉक्सिंग), विजय शर्मा (भारोत्तोलन), ए. श्रीनिवास राव (टेटे), सुखदेव सिंग पन्नू (अॅथलेटिक्स), क्लेरेन्स लोबो (हॉकी, आजीवन), तारक सिन्हा (क्रिकेट, आजीवन), जीवन कुमार शर्मा (ज्युडो, आजीवन); व्ही.आर.बीडू (अॅथलेटिक्स, आजीवन)ध्यानचंद पुरस्कार : सत्यदेव प्रसाद (तिरंदाजी),भरत कुमार छेत्री (हॉकी), बॉबी अलॉयसियस (अॅथलेटिक्स), चौगले दादू दत्यात्रेय (कुस्ती).अर्जुन पुरस्कारामध्येपुन्हा एकदा नेमबाजांचे वर्चस्व राहिले. यावेळी श्रेयसी सिंग, राही सरनोबत व अंकुर मित्तल या पुरस्काराचे मानकरी ठरले. टेनिस स्टार रोहन बोपन्ना, गोल्फर शुभंकर शर्मा यांनाही अर्जुन पुरस्काराने गौरविले.अर्जुन पुरस्कार विजेत्यामध्ये नीरज चोप्रा, हिमा दास आकर्षणाचे केंद्र होते. विश्व ज्युनिअर विक्रमवीर चोप्रा यंदा राष्ट्रकुल व आशियाई सुवर्ण, तर हिमा विश्व युवा सुवर्ण विजेती ठरली.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार : राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडू, प्रशिक्षकांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 5:12 AM