पणजी : राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळायला हवा ही गोवा सरकारची भूमिका अखेर भारतीय ऑलिम्पीक संघटनेने शनिवारी मान्य केली. यावर्षी राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा होऊ शकत नाहीत हेही स्पष्ट झाले. येत्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात स्पर्धा होतील. त्याबाबतच्या तारखाही क्रिडा खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी शनिवारी येथे जाहीर केल्या.
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा पुढील वर्षी (2020) दि. 20 ऑक्टोबर ते दि. 4 नोव्हेंबर या कालावधीत आम्ही आयोजित करण्यास संघटनेने मान्यता दिल्याचे आजगावकर यांनी लोकमतला सांगितले. यामुळे आम्हाला स्पर्धेसाठी उर्वरित कामे करण्यास आता वेळ मिळेल. वाहतूक व्यवस्था, जेवण, निवास व्यवस्था, उद्घाटन सोहळा यासंबंधीची कामे करण्यासाठी निविदा जारी करण्यापूर्वी स्पर्धेची तारीख ठरणो गरजेचे असते. ही तारीख शनिवारी निश्चित झाल्याने आमचा मार्ग मोकळा झाला आहे. आम्ही स्पर्धेसाठी अनेक साधनसुविधा अगोदरच उभ्या केल्या आहेत व त्यासाठी काही कोटी रुपयेही खर्च केले आहेत, असे आजगावकर म्हणाले.
राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला आणखी सहा महिन्यांचा तरी कालावधी मिळायला हवा अशी भूमिका यापूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी मांडली होती. येत्यावर्षी मार्च महिन्यानंतर आम्ही राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा घेऊ शकतो, फक्त तारीख भारतीय ऑलिम्पीक संघटनेने निश्चित करायला हवी असेही गोवा सरकारचे म्हणणो होते. भारतीय ऑलिम्पीक संघटनेने गोव्याला यापूर्वी जो दहा कोटींचा दंड ठोठावला होता, तो माफ केला जावा, असा मुद्दा मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय क्रिडा मंत्र्यांना भेटून मांडला होता.
10 कोटींचा दंड माफ
दरम्यान, गोव्याला दहा कोटींचा दंडही माफ झाला आहे, असे आजगावकर यांनी सांगितले. भारतीय ऑलिम्पीक संघटना आमच्याकडून दंड स्वीकारणार नाही हे स्पष्ट झाले आहे. स्पर्धेसाठी आम्ही जो खर्च करायचा तो खर्च करू. ऑलिम्पीक संघटनेसाठी आम्ही स्पॉन्सरशीपही उभी करू, असे आजगावकर यांनी नमूद केले.