ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - बीसीसीआयच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी ज्याप्रमाणे जस्टिस आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली त्याचप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा महासंघामध्ये पारदर्शिता आणण्यासाठी अशाच प्रकारच्या समितीची स्थापना होणे आवश्यक आहे, असे मत भारताचा महान आॅलिम्पियन सुशील कुमारने व्यक्त केले.रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डातर्फे आयोजित क्रीडा चर्चासत्रात बोलताना सुशील कुमार म्हणाला, राष्ट्रीय क्रीडा महासंघांसाठी लोढा समिती असायला हवी. त्यामुळे महासंघांमध्ये पारदर्शिता येईल. प्रशिक्षकही उत्तर देण्यास बाध्य असतील. आरएसपीबीच्या सचिव रेखा यादव यांनी सांगितले की, अनेक उणिवा असल्या तरी बीसीसीआयने चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, यासाठी त्यांची प्रशंसा करावीच लागेल. पाच वेळा विश्व चॅम्पियनचा मान मिळविणाऱ्या एम. सी. मेरी कोमने दर्जेदार सपोर्ट स्टारची उणीव भासत असल्याचे सांगितले. मेरी म्हणाली, मला आठवते की आमच्याकडे केवळ एक बॉक्सिंग प्रशिक्षक होते. काही दिवसानंतर मला कळले की, त्यांच्याकडे बास्केटबॉल किंवा फुटबॉलची एनआयएसची पदवी होती. त्यानंतर ते द्रोणाचार्य पुरस्काराचेही मानकरी ठरले. जिम्नॅस्ट दीपा करमाकरचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी म्हणाले, गेल्या चार वर्षांत जिम्नॅस्टिकची एकही राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही. कारण भारतात दोन महासंघ भारतीय जिम्नॅस्टिकचे प्रतिनिधित्व करीत असल्याचा दावा करीत आहेत. याला जबाबदार कोण? आम्हाला सरावासाठी चांगल्या सुविधा पुरविल्यामुळे साईचे आभार मानायला हवे. (वृत्तसंस्था)
लोढा समितीसारख्या पॅनलची राष्ट्रीय क्रीडा महासंघांना गरज : सुशील कुमार
By admin | Published: May 09, 2017 9:30 PM