मुंबई : महाराष्ट्राचा स्टार जलतरणपटू वीरधवल खाडे याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ७१व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले. त्याचवेळी, महाराष्ट्राचा युवा नील रॉय याला ४०० मी. वैयक्तिक मेडले प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.भोपाळ येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय गटाची शर्यत अत्यंत चुरशीची रंगली. आशियाई स्पर्धेतील कांस्य पदक विजेता असलेल्या वीरधवलने सुवर्ण मिळवले खरे, मात्र त्याला एस. पी. नायरकडून कडवी टक्कर मिळाली. वीरधवलने ०.१३ सेकंदाच्या फरकाने सुवर्ण निश्चित करताना २४.७८ सेकंदाची वेळ नोंदवली. नायरने २४.८० सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य निश्चित केले. तसेच, अंशुल कोठारी याने २४.९१ सेकंदासह कांस्य पदक पटकावले.यानंतर, ४०० मीटर वैयक्तिक मेडलेची शर्यत महाराष्ट्राचा युवा नील रॉयने गाजवली. भले त्याने रौप्य मिळवले, पण आपल्याहून सरस असलेल्या प्रतिस्पर्ध्यांना त्याने चकीत केले. तामिळनाडूच्या अनुभवी एमिल रॉबिन सिंग याने सुरुवातीपासून आघाडी घेत बाजी मारताना ४ मिनिट ३३ सेकंद ९६ अशी विजयी वेळ नोंदवली. नीलने ४:३९.०२ अशा वेळेसह रौप्य पदकावर नाव कोरले, तर भोपाळच्याच अद्वैत पागे याने ४:३९.९४ वेळेसह कांस्य पदक जिंकले. दरम्यान, महिलांच्या १०० मीटर फ्रिस्टाइलमध्ये हरियाणाची आॅलिम्पियन शिवानी कटारिया हिने नवीन स्पर्धा विक्रम करताना ५८.५१ सेकंदाची वेळ नोंदवली. रेल्वेच्या अदिती धुमातकरला ५९.१५ सेकंदाच्या वेळेसह रौप्यवर समाधान मानावे लागले. तामिळनाडूच्या जयावीना एव्ही हिने १:०७.१७ अशी वेळ देत कांस्य पक्के केले.इतर निकाल-४०० मीटर मीडले : इमिल रॉबीनसिंग (तमिळनाडू, ४ मिनिटे ३३.९६ सेकंद), नील रॉय (महाराष्ट्र, ४.३९.०२), अद्वैत पागे (मध्य प्रदेश, ४.३९.९४).१०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक : संदीप सेजवाल (आरएसपीबी, १ मिनिट २.९४ सेकंद), पुनीत राणा (पालीस, १.४.३१), दानूश एस. (तमिळनाडू, १.४.३८).महिला : १०० मीटर फ्रीस्टाईल : शिवानी कटारिया (हरियाना, ५८.५१ सेकंद), अदिती धुमटकर (आरएसपीबी, ५९.१५), जयावीणा व्ही. (तमिळनाडू, १.०.१७).
राष्ट्रीय जलतरण : आॅलिम्पियन वीरधवलचे शानदार सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 3:56 AM