Naveen Kumar creates History MUMvsDEL : कोरोनाच्या दणक्यामुळे गेल्या वर्षी रद्द झालेली प्रो कबड्डी स्पर्धा यंदा मात्र जोमात सुरू झाली. पहिल्या दोन दिवसांत थरारक सामने पाहायला मिळाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तर पहिलाच सामना रोमहर्षक झाला. दिल्लीच्या दबंग खेळाडूंना यू मुंबाने झुंजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सामन्याअखेरीस अवघ्या चार गुणांच्या फरकाने दिल्ली मुंबई संघाच्या वरचढ ठरली. दिल्लीचा चढाईपटू नवीन कुमार याने आपला अप्रतिम खेळ दाखवला संघाला विजय मिळवून दिलाच. पण त्यासोबतच त्याने स्पर्धेत नवा इतिहास रचला.
नवीन एक्सप्रेस सुसाट...
दिल्ली विरूद्ध यू मुंबा या सामन्यात नवीन कुमारने दिल्लीच्या संघाकडून दमदार कामगिरी केली. त्याने तब्बल १२ रेड पाँईंट्स मिळवले. तसेच १ टॅकल पाँईंट आणि ५ बोनससह त्याने एकूण १७ गुण कमावले. त्याच्या १२ रेड पाँईंट्ससह नवीनने स्पर्धेतील ५०० रेड पाँईंट्सचा टप्पा पार केला. सर्वात कमी सामन्यात ५०० रेड पॉईंट्स मिळवण्याचा विक्रम नवीन कुमारच्या नावे झाला. त्याने ४७ सामन्यात ही किमया साधली. आधी मणिंदर सिंगच्या नावावर हा विक्रम होता. त्याने ५६ सामन्यात ही कामगिरी केली होती.
सामन्यात काय घडलं?
दबंग दिल्ली आणि यू मुंबा दोन्ही संघ हंगामातील आपले पहिले सामने जिंकून मैदानात उतरले होते. त्यामुळे सामना चुरशीचा होणार याची खात्री चाहत्यांना होतीच. अगदी तशीच सुरूवात झाली. दिल्लीने आधी आघाडी घेतली तर नंतर यू मुंबाने २०-१२ अशी गुणसंख्या करत आघाडी घेतली. सामन्यात नवीन कुमारने वेळोवळी संघाला मिळवून दिले. त्यामुळे थोड्याच वेळात दिल्लीचा संघ २०-२० अशा बरोबरीत आला. त्यानंतर प्रत्येक चढाईत एक-दोन गुण घेत घेत दोन्ही संघ आगेकूच करत होते. पण शेवटच्या टप्प्यात मात्र दिल्लीच्या संघाने सुपर रेड करत थोडी मोठी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत तीच आघाडी कायम राहिली. अखेर यू मुंबाला ३१-२७ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.