बुलढाणा: भोपाळ येथे सुरू असलेल्या १७ व्या राष्ट्रीय युवा ॲथेलेटिक्स स्पर्धेतील ११० मीटर अडथळा शर्यतीत बुलढाण्याच्या नयन सरडेला रजत पदकावर समाधान मानावे लागेल. दरम्यान पुणे प्रबोधिनीचा संदीप विनोद गौड याने सुवर्णपदक मिळवले. परंतू पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या ऐशियन गेम्समध्ये खेळण्याची या दोघांची संधी थोडक्यात हुकली. एशियन गेम्सच्या पात्रतेसाठी १३.९० सेकंदाची त्यांची वेळ थोडक्या हुकली.संदीप गौड व नयनने ऐशियन गेम्सच्या पात्रतेसाठी आवश्यक असलेली १३.९० सेकंदाची वेळ देण्यासाठी कसोसीने प्रयत्न केले. संदीप गौडने १४:०० सेकंदाची तर नयनने १४:२९ सेकंदाची वेळ नोंदवली. त्यावरून त्यांच्यामधील चुरसही स्पष्ट हाते. मात्र थोडक्यात सर्वोत्तम कामगिरी नोदविण्याची त्यांची ही संधी हुकली. मात्र महाराष्ट्राच्याच या दोघांनी ही स्पर्धा गाजवली आहे. १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान भोपाळ येथे या स्पर्धा होत आहे. यापूर्वी नयन सरडेने मुंबई येथील राज्यस्तरीय स्पर्धेत ११० मीटर अडथळा शर्यतीत ऑगस्ट महिन्यात रजत पदक पटकावले होते. त्यानंतर छत्तीगड मधील रायपूर येथे झालेल्या ३३ व्या वेस्टन झोन राष्ट्रीय ज्युनिअर ॲथेलेटिक्स स्पर्धेत नयनने ११० मीटर अडथळा शर्यतीत १४.४७ सेकंदाची नोंद करत सुवर्ण पदकावर नाव कोरले होते. दरम्यान भोपाळ येथी स्पर्धेत त्याने त्याचीच वैयक्तिक १४.२९ सेकंदाची वेळ नोंदवत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.
गुवाहाटी येथील स्पर्धेकडे लागले लक्ष
मुंबई, छत्तीगडमधील रायपूर नंतर भोपाळ येथील स्पर्धेत स्वत:च्या कामगिरीमध्ये नयन सातत्यपूर्ण सुधारणा करत आहेत. त्यामुळे गोवाहाटी येथे सप्टेंबर अखेर होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो सर्वोत्तम कामगिरी करण्याची आशा आहे. तशी तयारीही आपण करणार असल्याचे तो सांगतो. त्यामुळए गोवाहाटी येथील स्पर्धेकडे बुलढाणेकरांचे लक्ष लागून रहाले आहे. सध्या नयन हा नागपूर येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सराव करत आहे. दरम्यन हैद्राबाद आणि बंगळुरू क्रीडा प्रबोधिनीमध्येही जाण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने त्याला मिळाली आहे.
बुलढाण्याला जुने दिवस येणार?
समुद्र सपाटीपासून २ हजार १९० फूट उंचीवर असलेल्या बुलढाण्याचा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये १९८० ते १९९० च्या दशकात दबदबा होता. प्रबोधन विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूलचे खेळाडू ॲथलेटिक्समध्ये सातत्याने चमकत होते.१९९२ दरम्यान बुलढाण्यात एसपीडीएचे सेंटर आले. परंतू नंतर ते अैारंगाबाद येथे हलविण्यात आले होते. त्यानंतर बुलढाण्याची क्रीडा क्षेत्रात पिछेहाट झाली. आता या निमित्ताने पुन्ही संधी आली आहे.