ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 27 - गतविजेत्या मुंबईने पुन्हा एकदा रणजी विजेतेपदाच्या दिशेने कूच करताना स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. प्रत्येकी पाच बळी टिपणाऱ्या अभिषेक नायर आणि विजय गोहिल यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने अटीतटीच्या झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत हैदराबादचे आव्हान मोडीत काढले. कालच्या सात बाद 121 वरून पुढे खेळताना हैदराबादच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट प्रतिकार केल्याने मुंबईला अवघ्या 30 धावांनीच विजय मिळवता आला.
काल मुंबईने विजयासाठी दिलेल्या 232 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नायर आणि गोहिलच्या गोलंदाजीसमोर हैदराबादची अवस्था सात बाद 121 अशी झाली होती. मात्र आज खेळाला सुरुवात झाल्यावर हैदराबादच्या बी. अनिरुद्ध आणि सी. मिलिंद यांनी चिवट प्रतिकार केला. दोघांनीही आठव्या गड्यासाठी 64 धावांची भागीदारी करत मुंबईची डोकेदुखी वाढवली. पण मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या अभिषेक नायरने मिलिंद (29), मोहम्मद सिराज (0) आणि रवी किरण (1) यांना बाद करत हैदराबादचा दुसरा डाव 201 धावांवर संपुष्टात आणला. हैदराबादकडून एकाकी लढत देणारा अनिरुद्ध 84 धावांवर नाबाद राहिला. मुंबईच्या अभिषेक नायरने या लढतीत एकूण नऊ बळी टिपले.
तत्पूर्वी हैदराबादला विजयासाठी २३२ धावांचे आव्हान दिल्यानंतर चौथ्या दिवसअखेर मुंबईने त्यांची ७ बाद १२१ अशी केविलवाणी अवस्था केली होती.