कॅलिफोर्निया - अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियाच्या कॅलाबॅससमध्ये झालेल्या या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ब्रायंटच्या 13 वर्षीय मुलीचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. बास्केटबॉल जगतातील एक दिग्गज खेळाडू अशी ओळख असलेल्या ब्रायंटच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉस एंजलिसपासून 65 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर कोबी ब्रायंटच्या मालकीचं होतं. हवेत हेलिकॉप्टरला आग लागून ते झुडपात कोसळलं. अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरमधील कोणीही वाचू शकलं नाही. हेलिकॉप्टरमध्ये आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
कोबी ब्रायंट हा 20 वर्षे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये सक्रिय होता. या काळात त्याने पाच चॅम्पियनशीप जिंकल्या. तसेच 18 वेळा 'एनबीए ऑल स्टार' ने गौरवण्यात आलं होतं. कोबी ब्रायंट याच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शोक व्यक्त केला आहे. 'कोबी ब्रायंट, जगातील ग्रेट बास्केटबॉलपटू असून त्याने नुकतीच आपल्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्याचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम होतं.' असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही ब्रायंटच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. 'कोबी ब्रायंट महान होता आणि आपल्या आयुष्यातील दुसऱ्या इनिंगला सुरुवात करत होता. पालक म्हणून गियानाचा मृत्यू ही आमच्यासाठी दु:खद घटना आहे. मिशेल आणि मी ब्रायंट कुटुंबाचं सांत्वन करतो' असं बराक ओबामा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CAA : सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण
भारतीय लष्कर झालं सज्ज; 40 दिवस युद्धासाठी पुरेल एवढा शस्त्रसाठा केला जमा, कारण...
Iran - US News : इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला
‘अवनी’चा अहवाल न दिल्यास निधी रोखणार; राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचा इशारा
Delhi Election 2020: कोट्यधीश उमेदवारांमध्ये आप-भाजपचाच बोलबाला; धर्मपाल लाकडा २९० कोटींचे मालक