जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा वाढणारा आकडा चिंताजनक आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख 83,326 वर पोहोचला आहे. त्यापैकी 1 लाख 34,616 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब अशी की 5 लाख 10, 350 रुग्ण बरे झाले आहेत. पण, कोरोना व्हायरसमुळे NBA ( नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचा) स्टार खेळाडू कार्ल अँथोनी टाऊन्स याच्या आईला प्राण गमवावे लागले आहेत. जॅकलीन टाऊन्स असे त्यांचे नाव होते.
जॅकलीन या एका महिन्यापासून या आजाराशी संघर्ष करत होत्या, असे टाऊन्स कुटुंबीयांनी सांगितले. 25 मार्चला त्या कोमात गेल्या. NBA नेही कार्लच्या आईला श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले की,''कार्लच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशा कठीण प्रसंगी देव कार्लच्या कुटुंबीयांना ताकद देओ, ही प्रार्थना.''
NBA खेळाडू रुडी गोबर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं 11 मार्चपासून स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. कार्लनं कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 1 लाख डॉलरचा निधी गोळा केला आहे.