सुनील गावसकर लिहितात...पाकिस्तानवरील भारताचा विजय दोन्ही संघांमधील फरक अधोरेखित करतोच, शिवाय आम्ही जेतेपदाचा बचाव करण्यासाठी चॅम्पियन्समध्ये आलो आहोत, असा अन्य संघांना संदेश देणारा आहे. संघाची ही चौफेर अष्टपैलू कामगिरी ठरली. पाकिस्तानला निश्चिंतपणे नमविण्याची ‘विराट अॅन्डकंपनी’ची पद्धत फारच सुरेख होती. या देखण्या विजयानंतरही भारताने क्षेत्ररक्षणातील सुधारणेवर भर द्यायला हवा. पाकवर विजय मिळणे शक्य होत असताना खेळाडूंचा दृष्टिकोनदेखील सोपा होताना जाणवला. याची झलक झेल सुटताना दिसून आली. लंकेने द.आक्रिकेविरुद्ध सुरुवात झकास केली, पण नंतर फलंदाज अचानक बॅकफूटवर आले. त्यामुळे धावांच्या गतीलादेखील खीळ बसली. भारताविरुद्ध कर्णधार अँजेलो मॅथ्यूज परतणार असल्याने संघ भक्कम होईलही, पण मॅथ्यूजने स्वत:च्या गोलंदाजीतील ओव्हर गतीवर भर द्यावा. या चुकीमुळे काळजीवाहू कर्णधार उपुल थरंगा याला दोन सामन्यासाठी निलंबन झेलावे लागले आहे. ओव्हर गती ही भारतीय उपखंडात नेहमीचीच डोकेदुखी आहे. याच समस्येमुळे अन्य काही संघदेखील दोषी ठरले. भारतीय संघ मोठे ‘रनअप’ घेणाऱ्या चार गोलंदाजांचा वापर करीत आहे. या गोलंदाजांच्या ओव्हर गतीबद्दल सावधपणा बाळगणे आवश्यक आहे. त्याचे कारण असे की, महत्त्वाच्या कुठल्याही सामन्याआधी कर्णधार निलंबित व्हावा, हे कुणालाही आवडणारे आणि परवडणारे नाही. पाकविरुद्ध अनुभवी खेळाडूंनी आपापली जबाबदारी ओळखलीच, पण मला प्रभावित केले ते हार्दिक पांड्याने. कर्णधाराच्या सोबतीने या युवा खेळाडूने कमालच केली. अश्विनऐवजी पांड्याला झुकते माप दिल्याने काहींच्या भुवया उंचावल्या असतील, पण पांड्याने निवड सार्थ ठरविली. कोहलीने पांड्याला महेंद्रसिंग धोनीऐवजी ‘फिनिशर’ म्हणून वापरल्यास आश्चर्य वाटू नये. पाकविरुद्ध जडेजाचा अनुभवदेखील लाभदायी ठरला. लंकेच्या संघाला फलंदाजीत मुरब्बीपणा दाखवावा लागेल. गोलंदाजीतील उणिवा मात्र आफ्रिकेविरुद्ध चव्हाट्यावर आल्या. याशिवाय संघाला क्षेत्ररक्षणातही मेहनत घ्यावी लागेल. भारताविरुद्ध उल्लेखनीय सुधारणा करणे गरजेचे आहे. लंका संघात मोठ्या प्रमाणावर डावखुरे फलंदाज आहेत. यामुळे भारत अश्विनला संधी देईल, असे दिसते. भारतीय संघ मोठ्या संधीच्या शोधात असल्याने कुणाशीही ‘दोन हात’ करण्याची संघाची तयारी आहे.(पीएमजी)
गोलंदाजीत षटकांच्या गतीवर लक्ष देणे गरजेचे
By admin | Published: June 08, 2017 4:19 AM