श्रेया केने
वर्धा- ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. कारण खेळाडूंना सरावा करीता लागणारे साहित्य व सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे या खेळाडूंची कामगिरी तुलनेने कमी दर्जाची होते. महानगरीय शहराप्रमाणे तालुकास्तरावर खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे मनोगत व्हॉलीबॉलची राष्ट्रीय खेळाडू देवांशी हिवसे हिने लोकमतला दिलेला खास मुलाखतीत व्यक्त केले.
‘खेलो इंडिया’ या उपक्रमात तिची १७ वर्षाखालील वयोगटात नुकतीच निवड झाली आहे. राष्ट्रीय संघाकरिता निवड झालेली ती जिल्ह्यातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. या माध्यमातून निवडक खेळाडूंचा राष्ट्रीय संघात समावेश करून आॅलिम्पीकची तयारी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर घेतलेल्या मुलाखतीत तिने अनेक बाजुंची उकल केली.
देवांशीच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. वडील दिव्यांग तर आई गृहिणी, आजीच्या सेवानिवृत्ती वेतनावर घर चालते. या परिस्थीवरही तिने मात करीत खेळण्याची जिद्द कायम ठेवली. घरून प्रोत्साहन मिळत असले तरी स्पर्धांमध्ये सहभाग घेताना आर्थिक बाजू कमकूवत पडते. अशावेळी तिचे प्रशिक्षक व तालुका क्रीडा मार्गदर्शक कपील ठाकूर मदत करतात. वर्षभर दोन तास कसून सराव होतो. यामुळेच आर्वी सारख्या लहानशा शहरातून आजवर ४४ राष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहे.
व्हॉलीबॉल इनडोअर खेळल्या जातो. तालुकास्तरावर ही सुविधा नसल्याने ठाकूर सर शाळेतील सभागृहात मुलांची प्रॅक्टीस करून घेतात, असे देवांशी पुढे बोलताना सांगितले. भारतीय व्हॉलीबॉल संघाचा आॅलिम्पिकमध्ये फारसा चांगला परफार्ममन्स नाही या पार्श्वभूमिवर चांगली कामगिरी करायची आहे. याकरिता भरपूर मेहनत घेत असल्याचे ते पुढे म्हणाले.