- ललित झांबरे
जळगाव : बुद्धिबळात ग्रँडमास्टर, इंटरनॅशनल मास्टर असे किताब बंद करण्याची वेळ आली आहे. त्याऐवजी इतर खेळांप्रमाणेच बुद्धिबळातही जागतिक क्रमवारी हवी, असे मत ब्रिटिश ग्रँडमास्टर आणि फिडे’चे उपाध्यक्ष नायजेल शॉर्ट यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्यातर्फे आयोजित स्पर्धेसाठी ते आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली.
ते म्हणाले, ‘पूर्वी ग्रँडमास्टर हा किताब मिळणे अवघड होते. परंतु, आता जागतिक बुद्धिबळ नियंत्रण संस्था (फिडे)ने काही निकष शिथिल केल्याने आज जगात जवळपास १६०० ग्रँडमास्टर्स आहेत. बुद्धिबळात अगदी नवख्या खेळाडूलाही २००० रेटिंग सहज मिळते. परंतु, याचीच तुलना तुम्ही टेनिसशी केली तर टेनिसमध्ये क्रमवारीतील २००० वा खेळाडू हा क्लब लेव्हललाच खेळणारा असेल. यासाठीच बुद्धिबळातील किताबांची संकल्पना कालबाह्य झाली असल्याचे आपण पूर्वीपासून म्हणत आहोत, असे ते म्हणाले.
शॉर्ट म्हणाले, ‘जॉर्जियामध्ये तुम्हाला बहुतांश खेळाडू कॅरो कान बचावानेच खेळताना दिसतील. लाटव्हियन खेळाडूंचा खेळ आक्रमक असतो. मात्र, भारतीय खेळाडूंची स्वतंत्र शैली आहे. त्यांनी विश्वनाथन आनंदची नक्कल न करता सर्वांगीण खेळ दाखविलेला आहे.’ असे सांगून ते म्हणाले, ‘ बुद्धिबळात महिला व पुरुष खेळाडूंच्या तंत्र व शैलीतील फरकाबद्दल चर्चा होते. त्यातून गैरसमजही होतात. नायजेल शॉर्टसोबत खेळण्याइतपत महिलांकडे बुद्धी नाही असे वृत्त एकदा प्रसिद्ध झाले. परंतु, मी प्रत्यक्षात असे बोललोच नव्हतो.
ते म्हणाले, ‘बुद्धिबळासह कोणत्याही खेळात महिलांना दुहेरी संधी असते. एकतर त्या फक्त महिलांसाठीच्या स्पर्धातही सहभागी होऊ शकतात आणि खुल्या स्पर्धांमध्येही भाग घेऊ शकतात.’ बुद्धिबळाच्या क्लासिक, रॅपिड व ब्लिट्झ या तीन प्रकारांपैकी रॅपिड ही आपली खासियत होती; परंतु वाढत्या वयात क्लासिक खेळासाठी जी दीर्घकाळ एकाग्रता राखणे आवश्यक असते. फिटनेसही तेवढा नसतो त्यामुळे रॅपिड बुद्धिबळ अधिक श्रेयस्कर असते.