Javelin thrower Neeraj Chopra failed to won Diamond League finals - ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे सुवर्णपदक नावावर असलेला नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) डायमंड लीग फायनल जिंकण्यात अपयशी ठरला. २५ वर्षीय नीरजने गतवर्षी झ्युरिच येथे डायमंड लीगचे जेतेपद पटकावले होते आणि हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला होता. आज त्याला जेतेपद कायम राखून झेक प्रजासत्ताकचा व्हीटेजस्लाव व्हेस्ली ( २०१२ व २०१३) आणि याकुब वाडलेज्च ( २०१६ व २०१७) यांच्या पंक्तित जाऊन बसण्याची संधी होती. पण, त्याला ८३.८० मीटरचे सर्वोत्तम अंतर पार करता आले. याकुबने शेवटच्या प्रयत्नात ८४.२४ मीटर लांब भालाफेक करून जेतेपद पटकावले. ४४ सेंटी मीटरच्या फरकाने नीरजला डायमंड लीगचे जेतेपद कायम राखता आले नाही. त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
फिनलँडच्या ऑलिव्हर हेलँडरने दुसऱ्या प्रयत्नात ८३.६७ मीटर लांब भालाफेकून दुसऱ्या स्थानावर आला. पण, नीरजने यावेळी आघाडी घेतली अन् ८३.८० मीटर अंतर गाठले. नीरज त्याच्या या प्रयत्नावर फारसा खूश नाही दिसला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात ८१.३७ मीटर लांब भाला फेकला.. तो भालाफेकल्यानंतर खांद्याला हात लावत होता. सततच्या स्पर्धांमुळे कदाचित तो पूर्णपणे फिट नसल्याचा अंदाज अनेकांनी बांधला. तिसऱ्या फेरीअखेर नीरजने दुसरे स्थान टिकवले होते. नीरजने चौथ्या प्रयत्नात फाऊल केल्याने भारतीयांचं टेंशन वाढलं होतं, कारण आता त्याचे दोन प्रयत्न शिल्लक होते आणि त्यात त्याला याकुबच्या ८४.०१ मीटर अंतरापुढे जायचे होते.
याकुबने पहिल्या यशस्वी प्रयत्नानंतर पुढील तीन प्रयत्नांत फाऊल केले. नीरजने पाचव्या प्रयत्नातही निराश केले. त्याला ८०.७४ मीटर लांब भाला फेकता आला. याकुबने तीन फाऊलनंतर पाचव्या प्रयत्नात ८२.५८ मीटर लांब भाला फेकला. आता नीरजकडे डायमंड लीगचे जेतेपद कायम राखण्याची एकच संधी होती. त्यातही तो ८०.९० मीटर भाला फेकू शकला अन् जेतेपद कायम राखण्यात अपयशी ठरला.