पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकून सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय ट्रॅक अँड फील्ड खेळाडू ठरला. मात्र, या सामन्यात पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक पटकावत ऑलिम्पिकमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. या निकालानंतर नीरज चोप्राच्या आई-वडिलांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. "ज्याने सुवर्ण पदक जिंकलं, तोही आमचाच मुलगा आहे" असं म्हटलं आहे.
नीरज चोप्राची आई सरोज देवी म्हणाल्या की, "आम्ही खूप जास्त आनंदी आहोत, आमच्यासाठी रौप्य पदक हे सुवर्ण पदकासमानच आहे. ज्याने सुवर्ण पदक जिंकलं, तोही आमचाच मुलगा आहे. त्याने खूप मेहनत करून ते जिंकलं आहे. प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. तो जखमी झाला होता. त्यामुळे आम्ही त्याच्या कामगिरीवर खूश आहोत. जेव्हा नीरज घरी येईल तेव्हा त्याच्या आवडीचं जेवण बनवणार आहे."
रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राचे वडील सतीश कुमार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, " आपण प्रेशर टाकू शकत नाही. प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो, आज पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमचा दिवस होता, अर्शद सुवर्ण पदक जिंकण्यात यशस्वी झाला. दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपण भालाफेकीत पदक जिंकू शकलो, ही आनंदाची बाब आहे."
"नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचं मूर्तिमंत रुप!"; रौप्य पदक जिंकताच मोदींनी केलं कौतुकपॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. नीरजचा एक फोटो देखील शेअर केला. "नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचं मूर्तिमंत रुप! त्याने वेळोवेळी आपली चमक दाखवली आहे. आणखी एक ऑलिम्पिक यश मिळवून पुनरागमन केल्याने भारत आनंदी आहे. रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन. तो असंख्य खेळाडूंना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्यासाठी सतत प्रेरणा देत राहील" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.