लुसाने : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक रौप्यपदक पटकाव ल्यानंतर भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आता लुसाने डायमंड लीग स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. गुरुवारी रंगणाऱ्या या स्पर्धेतून चमकदार कामगिरी करत पुढील महिन्याच्या सत्रात पुन्हा एकदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचा निर्धार नीरजने केला आहे.
प्रदीर्घ काळापासून मांडीच्या दुखापतीने ग्रस्त राहिल्यानंतर नीरजने ८ ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटरची फेक करत रौप्य पटकावले होते. नीरजने शनिवारी या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. २०२२ मध्ये नीरजने डायमंड लीग स्पर्धा जिंकली होती. गेल्या वर्षी मात्र त्याला अमेरिकेत झालेल्या डायमंड लीग अंतिम फेरीत झेक प्रजासत्ताकच्या याकूब वाड्लेचनंतर दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते.
यंदा डायमंड लीग अंतिम फेरी १४ सप्टेंबरला ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे होईल. अंतिम फेरीसाठी नीरजला डायमंड लीग सीरिजपर्यंत अव्वल सहा स्थानांमध्ये रहावे लागेल. ५ सप्टेंबरला ज्यूरिख येथे आणखी एक डायमंड लीग स्पर्धा होणार असून, यामध्येही पुरुष भालाफेकीचा समावेश आहे. १० मे रोजी झालेल्या दोहा डायमंड लीगमध्ये वाड्लेचनंतर दुसऱ्या स्थानी राहिलेला नीरज सध्या ७ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
नदीमचा सहभाग नाहीपॅरिस ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता पाकिस्तानच्या अर्शद नदीमने या स्पर्धेत सहभाग घेतलेला नसला, तरी नीरजपुढे आव्हान सोपे नाही. पॅरिस ऑलिम्पिक अव्वल सहामध्ये स्थान मिळवलेल्या पाच खेळाडूंविरुद्ध नीरजला खेळावे लागणार आहे. वाड्लेचसह ग्रेनेडाचा दोनवेळचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स याच्याकडूनही नीरजला कडवे आव्हान मिळेल.