भारताचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला टोको ऑलिम्पिक स्पर्धेच्या फायनलपूर्वी टेंशन आलं होतं. त्याचा भाला पाकिस्तानचा खेळाडू अर्षद नदीम यानं घेतला होता अन् तो त्यानं सराव करत होता. भाला मिळत नसल्यानं नीरज तणावात होता अन् अखेरीस त्याला तो अर्षदच्या हाती दिसला. हा माझा भाला आहे मला दे, असे बोलून नीरजनं तो घेतला व भालाफेक केली. पण, या TOIला दिलेल्या मुलाखतीत नीरजनं सांगितलेल्या या प्रसंगानं पाकिस्तानी खेळाडूवर खालच्या पातळीवरची टीका होऊ झाली. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हल्लाबोलच केला. पण, नीरजनं या दिवसभरातील घडामोडीवर स्पष्ट मत मांडले. त्यानं त्याच्या अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला अन् या मुद्याचं राजकारण करणाऱ्यांना सुनावलं. ( Sports teaches us to be together and united, Say Neeraj Chopra).
काय घडलं होतं?फायनलपूर्वी भालाफेकीला जाण्यापूर्वी नीरजचा भाला गायब होता. नीरज तो भाला इकडेतिकडे शोधताना दिसला अन् तो भाला पाकिस्तानच्या नदीमच्या हातात सापडला. नीरजचा भाला घेऊन नदीम मैदानावर फिरत होता. नीरजला हे कळताच त्यानं तो त्याच्याकडून घेतला. नीरज काय म्हणाला, ऑलिम्पिक फायनलपूर्वी मी माझा भाला शोधत होतो, मला तो सापडत नव्हता. अचानक मला तो अर्षद नदीमच्या हाती दिसला. तो माझा भाला घेऊन मैदानावर फिरत होता. तेव्हा मी त्याला म्हणालो,''भाई तो भाला मला दे तो माझाय.. मला तो फेकायचा आहे.'' त्यानं मला तो परत केला.
आज नीरज काय म्हणाला?नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. तो म्हणाला, मी सर्वांचे आभार मानतो की, तुम्ही मला खूप प्रेम दिलंत, पाठिंबा दिलात. पण, आता एक मुद्दा सुरू आहे की, भालाफेकीच्या फायनलपूर्वी माझा भाला हा अर्षदच्या हाती होता, हे मी एका मुलाखतीत सांगितले. त्याचा खूप मोठा मुद्दा बनवला गेला. पण, यात काही नवीन नाही, सर्व खेळाडू त्यांचा भाला तिथे ठेवतात आणि तो अन्य खेळाडूही वापरू शकतो. त्यामुळे माझा भाला घेऊन अर्षद सराव करत होता, यात चुकीचे काहीच नाही. मला दुःख या गोष्टीचं वाटतंय की माझं नाव वापरून लोकं याचा मोठा मुद्दा करत आहेत. खेळ सर्वांना एकत्र आणतो.